निकालापूर्वीच नोटीस;महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या
Notice even before the result; Mahavikas Aghadi candidate's problems increased
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यानं
महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावी व खर्चात तफावत राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
बीडमधील सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या रेकॉर्डची तिसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुशांताकुमार बिस्वास यांनी 12 मे रोजी केली होती.
या तपासणीमध्ये बजरंग सोनवणे यांनी 7 ते 10 मे या कालावधीतील खर्च सादर केला. पहिल्या व दुसऱ्या खर्चातील तफावत अनुक्रमे 5 लाख 31 हजार 294 रुपये व 4 लाख 27 हजार अशी एकूण 9 लाख 59 हजार 231 ऐवढी तफावत मान्य केली.
मात्र ही रक्कम नोंदवहीमध्ये समाविष्ट करून तशी नोंद घेणे आवश्यक असताना ती नोंद घेण्यात आलेली नाही. त्यामुळे 9 लाख 59 हजार 231 एवढी तफावत बजरंग सोनवणे यांच्या खर्चात आढळून आली. या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून बजरंग सोनवणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
बीडमध्ये यावेळी भाजपनं प्रीतम मुंडे यांना संधी न देता पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांना
लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे. गेल्यावेळी या मतदारसंघातून प्रीतम मुंडे या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. मात्र यंदा बदलेल्या राजकीय समीकरणामुळे या मतदारसंघात एक हायहोल्टेज लढत होण्याची शक्यता आहे.