उद्धव ठाकरे ,मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवत आहेत ;मंत्र्यांचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray is sending messages to meet Modi; minister's sensational claim

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA मध्ये यायचे आहे.
त्यासाठी उद्धव ठाकरे हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत, असा खळबळजनक दावा
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यांनी रविवारी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला.
यावेळी दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्रात निघालेले फतवे व उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाल्याची कबुली दीपक केसरकर यांनी दिली.
मात्र, आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक सनसनाटी दावा केला. उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये यायचं आहे. त्यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मेसेज पाठवत आहेत, असे केसरकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोल्समध्ये भाजपप्रणित एनडीए आघाडीची सरशी होत असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, अशी चिन्हं दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीकास्त्र सोडले. एक्झिट पोलनंतर संजय राऊतांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जा.
ते दगड मारतील. पिसाळलेला कुत्रा कोणालाही चावू शकतो, असे जहरी उद्गार संजय शिरसाट यांनी काढले. तसेच एक्झिट पोलच्या आकड्यावर जाऊ नका. महाराष्ट्रात शिंदे गटाच्या 11 ते 12 जागा निवडून येतील, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.
एबीपी माझा- सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23, महायुतीला 24 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
तर सांगली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी होण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे गटाला 9, अजित पवार गटाला एका जागेवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.