शरद पवारांनी सांगितला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फार्मुला

Sharad Pawar told Mahavikas Aghadi's formula for the post of Chief Minister

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एक सूचक विधान केलं आहे.

 

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन चर्चा सुरु असतानाच शरद पवार यांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कसा ठरवला जाईल याबद्दल भाष्य केलं आहे.

 

बुधवारी सकाळी कोल्हापूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवारांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला पवारांनी सविस्तर उत्तर देताना मुख्यमंत्री ठरवण्याचा फॉर्म्युला काय असेल याबद्दलचे स्पष्ट संकेत दिले.

 

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली जावी अशी मागणी केली जात असल्याचं दिसून आलं आहे.

 

स्वत: उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात अनेक उघडपणे मागणी केल्याचं दिसून आलं आहे. किमान चार भिंतींच्या आतमध्ये तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी काही

 

आठवड्यांपूर्वी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडे केली होती. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सूचक विधान करताना उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचं म्हटलं होतं.

 

एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही मागणी होत असतानाच काँग्रेसने मात्र आताच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा करण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं होतं.

 

सध्या महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं म्हटलं होतं. हायकमांडकडून ज्यापद्धतीने सांगितलं जाईल तशी वाटचाल असेल असे संकेत काँग्रेसने ठाकरेंच्या मागणीवर बोलातना दिले होते.

 

तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही, ‘शरद पवार आमचे नेते आहेत. ते जी भूमिका घेतील ती पक्षाची भूमिका असेल,’ असं म्हटलं होतं.

 

एकीकडे ठाकरेंनी थेट उमेदवार जाहीर करण्याची मागणी केलेली असतानाच दोन्ही काँग्रेसने फारच सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. आता शरद पवारांनी पहिल्यांदाच उघडपणे यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल बोलताना शरद पवारांनी, “आताच मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर करावं असा आमचा आग्रह नाही,” असं विधान केलं आहे. तसेच पुढे बोलताना,

 

“मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल आता बोलणं योग्य नाही,” असंही शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदासाठी आताच चेहरा देण्याची गरज वाटत नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

 

सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचं उद्दीष्ट हे स्थिर सरकार देण्याला असेल असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. “लोकांच्या पाठींब्यानंतर एक स्थिर सरकार देऊन.

 

स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं आमचं उद्दीष्ट आहे,” असं शरद पवार म्हणाले. तसेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय कसा घेतला जाईल

 

याबद्दल बोलताना शरद पवारांनी, “मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर घेतला जाईल,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *