निकालानंतर मोदींचाच केंद्रीय मंत्री त्यांच्या विरोधात बोलला;अपयशाचं सांगितले कारण
After the result, Modi's own Union Minister spoke against him; said the reason for the failure
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. १८ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवता आलं नाही.
भाजपा आता मित्रपक्षांच्या भरवशावर सरकार स्थापन करणार असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या इंडिया आघाडीचेही २४० खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे नव्या सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे. तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्ये भाजपाला प्रवेश करता आलेला नाही.
तर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणात भाजपाचं मोठं नुकसान झालं आहे. हरियाणातील त्यांची खासदारांची संख्या अर्धी झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि खासदार राव इंद्रजीत सिंह यांनी मोठं वक्तव्य करत भाजपाला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे.
राव यांनी भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’ या घोषणेवर आक्षेप नोंदवला आहे. राव म्हणाले, “४०० पारचा नारा देणं ही मोठी चूक होती.”
राव इंद्रजीत सिंह म्हणाले, “या लोकसभा निवडणुकीत हरियाणा भाजपाची आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. आमच्या गावखेड्यांतल्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली नसती तर मी गुरुग्रामच्या जागेवर पराभूत झालो असतो.”
गुरुग्राम मतदारसंघात केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांचा पराभव केला आहे. राव यांना ८ लाख ७ हजार मतं मिळाली तर राज बब्बर यांना ७ लाख ३३ हजार मतं मिळाली आहेत.
त्यांनी ८० हजार मतांनी विजय मिळवला. मागील निवडणुकीत राव यांनी ३ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी अग्निपरीक्षेसारखी होती. दरम्यान, या विजयानंतर राव इंद्रजीत म्हणाले, “हरियाणा भाजपात सारं काही आलबेल नाही.”
राव इंद्रजीत म्हणाले, “भाजपाचा ४०० पारचा नारा चुकीचा होता. प्रसारमाध्यमं मला विचारत होती की, भाजपा यंदा ४०० पार जाणार का? त्यावर मी काय बोलणार? मुळात भाजपात अंतर्गत परिस्थिती बरी नाही.”
भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला गुरुग्राम लोकसभा जिंकणं सोपं वाटत होतं. मात्र राज बब्बर यांनी तब्बल ७.३३ लाख मतं घेतं राव यांच्या तोंडाला फेस आणला. मतमोजणीच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत राज बब्बर आघाडीवर होते.
मात्र अखेरच्या काही तासांमध्ये त्यांना आघाडी मिळाली, जी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. पक्षाने राव यांना लोकसभेचं तिकीट देण्यास विलंब केला होता.
परिणामी त्यांना प्रचाराला फारसा वेळ मिळाला नाही, असं राव यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यांना केवळ १५ दिवस प्रचार करता आला.