अजित पवारांना महायुतीतून बाहेर करण्यासाठी भाजपवर संघाचा दबाव ?
Pressure on BJP to expel Ajit Pawar from the Grand Alliance?
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काय फायदा झाला, अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली.
भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझरनं’नं लोकसभेतील खराब कामगिरीनंतर राष्ट्रवादीसोबत भाजपनं आघाडीच्या करण्याच्या निर्णयावर टीका केली. यानंतर आता भाजप-राष्ट्रवादीच्या काडीमोडाची चर्चा जोर धरु लागली आहे.
भाजप राष्ट्रवादीसोबतची युती तोडून विधानसभेची निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढवू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पाडून अजित पवार गटाशी हातमिळवणी करण्याचा भाजपचा निर्णय संघाला पटलेला नाही.
‘भाजप, संघाच्या केडरची भूमिका पवारविरोधी राहिली आहे. सिंचन आणि राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी पवारांचा संबंध असल्यानं संघ, भाजप पवारविरोधी आहे.
पण अजित पवारांसोबत युती करताना विचारधारेलाच तिलांजली देण्यात आली. याशिवाय अजित पवारांना उपमुख्यमंत्री करुन त्यावर मीठ चोळण्यात आलं,’ असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
‘लोकसभा निवडणुकीत भाजप-संघाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास तयार नव्हते हे स्पष्टपणे दिसलं. बऱ्याच ठिकाणी ते निष्क्रिय राहिले.
कार्यकर्ते भाजपवरही नाराज होते. त्याचा परिणाम निकालाल दिसला. भाजप २३ जागांवरुन ९ वर घसरला,’ असं भाजप नेत्यानं सांगितलं.
संघात हृयात घालवलेले स्वयंसेवक रतन शारदा यांनी ऑर्गनायझरमधील त्यांच्या लेखात अजित पवारांमुळे भाजपच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
अजित पवारांसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात भाजपची एक अडचण आहे. ‘अजित पवारांची साथ सोडून शिंदेसेनेसोबत विधानसभेची निवडणूक लढवल्यास भाजपनं अजित पवारांचा वापर करुन घेतल्याचा मेसेज जातो.
भाजप वापरुन फेकून देतो असा संदेश गेल्यास ते महागात पडू शकतं. पण अजित पवारांना सोबत ठेवल्यास ते ओझं ठरु शकतात. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून
अजित पवार महायुतीच्या उपयोगाचे नसल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे भाजपला राष्ट्रवादीचं काय करायचं याचा विचार करावा लागेल,’ असं अन्य एका नेत्यानं म्हटलं.
भाजप आणि राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नसल्याचं आता वारंवार दिसू लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा महागात पडल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले.
प्रफुल पटेलांना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट देण्यात आलेलं नाही. ऑर्गनायझरमध्ये लेख छापून आल्यानंतर भाजपच्या एकाही मंत्र्यानं राष्ट्रवादीसोबतच्या युतीची ठामपणे पाठराखण केलेली नाही.
उलट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी काल राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादीचे नेते होते.
त्यांच्यासोबत भाजप आणि शिंदेसेनेचा एकही नेता नव्हता. त्यामुळे काडीमोड घेण्याची प्रक्रिया ‘ऑर्गनाईज्ड’ झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या विचारसरणीत फार मोठा फरक आहे. त्यामुळे नेते एकत्र आले, तरी कार्यकर्ते एकत्र येत नाहीत. अजित पवारांसोबत राहिल्यास नुकसानच होईल, अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये आहे.
त्यामुळे अजित पवारांना दूर करण्यासाठी भाजपशी संबंधित संघटना, त्यांचे पाठिराखे कामाला लागले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका सुरु असताना भाजप नेते गप्प आहेत. त्यामुळे हे सगळं भाजपच्याच परवानगीनं सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
ऑर्गनायझरनं भाजप-राष्ट्रवादीच्या युतीला लक्ष्य केलेलं असताना भाजपचे नेते पुढे आलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झालेली आहे. राष्ट्रवादीचा कोणताही बडा नेता भाजप आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांना सुनावताना दिसत नाही.
मोजक्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली असली तरी ती फारच गुळमुळीत आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोणताच ठोस मेसेज मिळताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेतील पराभवामुळे खच्ची झालेलं कार्यकर्त्यांचं मनोबलही वाढत नाही.