महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण ?,या प्रश्नावर काय म्हणाले शरद पवार
Who is the Chief Minister of Mahavikas Aghadi? What did Sharad Pawar say on this question?
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरुन महाविकास आघाडीमधील तिन्ही घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन सूचक विधान केलं आहे.
सध्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल यावरुन घटक पक्षांमध्ये शाब्दिक घमासान सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत
उद्धव ठाकरेंच्या नावालाच मुख्यमंत्री म्हणून पसंती असल्याचं आणि तेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं दोनच दिवसांपूर्वी सूचित केल्यानंतर पवारांनी यावर भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा करताना, “मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे.
लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना पाहून मतदान केलं आहे. अर्थात तिन्ही पक्षांची एकत्र ताकद होती. मात्र बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही,” असं सूचक विधान केलं होत.
शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस पत्रकारांनी संजय राऊतांनी केलेल्या विधानावरुन, “उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का?” असा थेट प्रश्न विचारला.
पत्रकाराच्या या प्रश्नाला शरद पवारांनी अवघ्या 6 शब्दांमध्ये उत्तर दिलं. ‘सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे,’ असं उत्तर शरद पवारांनी दिलं. आमची आघाडी हाच आमचा समुदायिक चेहरा आहे. इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही.
“48 पैकी 31 जागा ज्या विचाराचे खासदार आले आहेत त्यावरून जनतेचा ट्रेण्ड काय आहे लक्षात येतं,” असा टोला शरद पवारांनी विधानसभेला ट्रेण्ड काय असतील या प्रश्नावरुन लगावला. “राज्यात सरकार बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे.
288 विधानसभा निवडणुकीत 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे आम्हाला अनुकूल परिस्थिती असून संधी आहे,” असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. लोकसभेची मानसिकता विधानसभेलाही कायम राहील,
असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच मोदींनी महाराष्ट्रात 18 जागी सभा घेतल्या त्यापैकी 14 जागी भराव झाल्याची आठवण पवारांनी करुन दिली.
“यावरुन मोदींच्या कामकाजावर जनता खुश नाही असं दिसतंय. मोदींची गॅरंटी चालली नाही. विधानसभेला मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात,” असा उपहासात्मक टोला पवारांनी लगावला.
लोकसभेच्या निकालानंतर राहुल गांधींना कोणी पप्पू म्हणणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींचं कौतुक केलं.
तसेच लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आणीबाणीचा उल्लेख करण्याची गरज नव्हती असं शरद पवार म्हणाले.
आणीबाणीचा 50 वर्षांपूर्वीचा विषय काढायची गरज आता नाही, असं पवार म्हणाले. तसेच मोदी सरकारला टोला लगावताना, “नितीश कुमार नसते तर यांचे सरकार आले नसते,” असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरुनही टोला लगावला. “अगोदरच्या कर्जात असताना या अर्थसंकलपामुळे त्यात अधिक भर पडणार आहे,”
असं शरद पवार म्हणाले. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना शरद पवारांनी, “नव्या पिढीला व्यवसानाधिन बसवण्याचे प्रमाण वाढल्याचे पुण्यावरून दिसते,” असं मोजक्या शब्दांमध्ये म्हटलं.
शिखर बँकेत नेमका काय घोटाळा झाला हे मी सांगू शकत नाही. पूर्ण माहिती मिळेल त्यावेळी आम्ही भाष्य करू, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. आम्ही विधानपरिषदेत जागा लढवणार नाही आम्ही मदत करणार, असंही शरद पवार यांनी सांगितलं.