अजितदादांचा सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचाराला सुरूवात
Ajitdad's campaign against Supriya Sule begins.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार आहे असं समजून मला मतदान केलं पाहिजे, अशी तंबी कार्यकर्ते आणि मतदारांना देतानाच, काही लोक भावनिक होतील,
माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
तसेच निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील आगामी काळातील आपले इरादे स्पष्ट केले. आतापर्यंत एकमेकांच्या कामाचं महत्त्व सांगत,
एकमेकांच्या कामाची स्टाईल सांगत ताई-दादा मतं मागायचे. परंतु यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे पवार कुटुंबात मोठा संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत.
बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने संभ्रमात असलेल्या बारामतीमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी भावनिक न होता व्यावहारिक राहण्याचा सल्ला देता.
तसेच येत्या लोकसभेत आपल्याला महायुती देईल, त्याच उमेदवाराचं काम करायचं आहे असे सांगताना भावनिक न होता सुप्रिया सुळे यांच्याविरोधातच काम करायचं आहे, असे अप्रत्यक्षपणे सांगून लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडला.
जर माझ्या विचारांचा खासदार झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी सांगू शकेन की, मोदीसाहेब माझ्या लोकांनी याला खासदार म्हणून निवडून दिले आहे. मी म्हणजे माझ्या, बारामतीकरांनी, इंदापूरकरांनी,
माझ्या दौंडकरांनी, भोर, वेल्हा, मुळशीकरांनी संबंधित उमेदवारांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या बारामतीकरांची कामं करायला हवीत, असं मी त्यांना हक्काने सांगू शकेन.
आतापर्यंत आपल्या आजूबाजूला किती तरी आमदार आणि खासदार होऊन गेले. पण आपल्या अडचणींना कोण आपल्याला उपयोगी पडतंय याचाही विचार करा, अजून खूप विकास कामं आपल्याला आपल्या करायची आहेत, असं अजित पवार म्हणाले.
गंभीर समस्येतून आपण जात आहोत. एकीकडे अजित सांगतो असं करा, दुसरीकडे वरिष्ठ सांगतो तसं करा. कुणाचं ऐकायचं असा प्रश्न तुमच्या समोर आहे.
पण कार्यकर्त्यांनो भावनिक न होता तुम्ही व्यावहारिक राहा. तुम्ही मला निवडणुकीत योग्य पद्धतीनं सहकार्य केलं (मतदान केलं) तर पुढची कामं होतील.
नाही तर तुमची कामं करायला मी बांधील नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला. एवढंच बोलून ते थांबले नाहीत तर महाराष्ट्राला मी स्पष्टवक्ता नेता म्हणून माहिती आहे, असं नेहमीचं पालुपदही त्यांनी ऐकवून दाखवलं.