मतपेटीत मतपत्रिका जास्त निघाल्याने शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली
The counting of votes in the teachers' constituency was stopped due to the excess of ballot papers in the ballot box
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून
प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे
तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. आता मतमोजणी प्रक्रिया थोड्यावेळाकरीता थांबवण्यात आली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. प्राथमिक फेरीत 64 हजार 848 मतपत्रिका अपेक्षित होत्या. मात्र एका मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर खळबळ उडाली आहे.
मतदान टेबलवर मतदानपत्रिका लावताना तीन मतपत्रिका जास्त निघाल्या आहेत. टेबलवर मतपत्रिका लावताना हिशोबापेक्षा तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला.
त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबलवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 3 मत पत्रिका जास्त आढळल्या आहेत.
मतमोजणी कक्षातील 22 नंबरच्या टेबलवर मोजण्यात आलेल्या टेबलवर मतपत्रिका जास्त आढळून आल्यात. 3 मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी.
मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे 3 मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते
त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील.
त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे.