विधान परिषद निवडणूक मतदानासाठी २५ कोटी,२ एकर जमीन दिल्या ,मोठ्या नेत्याचा आरोप
25 crores, 2 acres of land was given for voting in Legislative Council elections, a big leader's allegation

काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट आणि महाविकास आघाडीच्या छोट्या घटक पक्षांसह बहुसंख्य अपक्ष आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना केलेल्या मतदानामुळे विधान परिषद निवडणुकीत
महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. काँग्रेच्या प्रज्ञा सातव यांच्यासह ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असले,
तरी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाने समर्थन दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. याविषयी प्रतिक्रिया देताना
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काही आमदारांना 2 एकर जमीन दिल्याचा आरोप केला.
“याच सात लोकांनी चंद्रकांत हंडोरे यांना पाडलं होतं. आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही. शिवसेना राष्ट्रवादी यांचं कोणतंही मत फुटलेलं नाही. काँग्रेसचे ते सात जण केवळ कागदावर काँग्रेससोबत होते.” असं संजय राऊत म्हणाले.
“अपक्ष आमदारांचा भाव काल शेअर मार्केटसारखा वाढत होता. शिवसेनेकडे केवळ 15 मतं असतानाही मिलिंद नार्वेकर निवडून आले. शेकापचे जयंत पाटील निवडून आले असते, पण गणित जुळलं नाही.
जयंत पाटलांकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. जयंत पाटलांसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. ते महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक आहेत.
शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. पण काही आमदारांना 2 एकर जमीन देखील दिली गेली.” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“लोकसभेत जनतेने तुम्हाला नाकारलं त्यावर बोला, नाना पटोले या सात लोकांवर कारवाई करणार असं मी ऐकलं आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं सांगितलं आहे.
नाना पटोले निवडणूक होईपर्यंत ठाण मांडून बसले होते. काही आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात, 20-25 कोटी रुपये एका मताला दिले गेलेत, आम्ही आमच्याकडे जेवढी ताकद होती तेवढं लढलो” असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीवेळी पैशांचं वाटप झालं, काही लाख मते विकत घेण्यात आली,
याबाबतचे सगळे पुरावे आमच्या हातात आहेत, यामुळे विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या विरोधात याचिका दाखल केली, असं राऊत म्हणाले.