भाजप नेत्याचे मनोज जरांगेंना खुलं आव्हान
BJP leader's open challenge to Manoj Jarang
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी मोठा निर्णय घेतलाय. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलंय. विशेष म्हणजे जरांगेंचं उपोषण त्यांनी स्वत:च सोडायचा निर्णय़ घेतलाय.
कुठलाही राजकीय नेता यावेळी येणार नाहीय. उपोषण स्थगित करुन दुसऱ्या कामाला लागण्याचा विचार असल्याचं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं.
केवळ सलाईन लावून अंतरवालीत पडून राहण्यात काही अर्थ नाही. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगेंनी दिलाय.
तसंच फडणवीसांनी अनेक राजकीय नेत्यांना अडचणीत आणलं. मराठे संपवून तुम्हाला मोठं व्हायचंय का असा सवालही त्यांनी केलाय.
यावेळी मनोज जरांगे यांनी भाजप नेते प्रवीण दरेकरांवरही निशाणा साधलाय. 5 ते 7 जणं भाजपला लागलेली कीड असून दरेकरांमुळे भाजपला फटका बसणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तसंच दरेकरांनी आपल्या नादी लागू नये असा इशारा त्यांनी दिलाय.
मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्याला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचे बंधू मनोजदादा यांनी दरेकरांवर शिवराळ भाषेत टीका केली,
आज त्यांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यांना आमचे उमेदवार पाडायचं असतील तर त्यांनी 288 उमेदवार उभे करावेत, आम्हीही बघू कसे पाडता असं आव्हान लाड यांनी दिलंय
. दरेकर मराठा आहेत का तुम्ही विचारता, आम्ही मराठे आहोत का याचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून नकोय. आम्ही
तुमच्या सत्य परिस्थितीकर बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशाराच प्रसाद लाड यांनी दिलाय.
फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? कोर्टत महाविकास आघाडीने आरक्षण टिकवलं नाही हे मान्य आहे का? असे सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेत.
तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणं योग्य नाही, त्या प्रकरणाशी फडणवीसांचा संबंध नाही असं सांगत फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही
असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. आमच्यावर संस्कार आहेत, तुम्ही शिव्या देऊनही मी शिव्या दिल्या नाही. पण हे तुम्ही सुरूच ठेवला तर आम्हालाही या भाषेत बोलावं लागेल असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिलाय.
मनोज जरांगे निजामशाहीकडे मोगलाईकडे जात आहेत, जरांगे यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, त्यांना महिलांचं चालणारं घर बंद करायचं आहे का? महाविकास आघाडीचे ऐकून तुम्ही हे करताय का?
लहान भावाला जर सरकार पैसे देत असेल, दोन कोटी मराठ्यांना याचा फायदा होत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला आहे का ? असे प्रश्न प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना विचारले आहेत.
जरांगे जी भाषा बोलत आहेत, त्यातून शरद पवार यांच्या पाठीशी असल्याच्या वास येतोय असा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात
पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढलं आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी
कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होतं. पण त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते.