पवारांच्या अमित शाहांवरील टीकेने भाजपा नेते संतप्त
BJP leaders angry with Pawar's criticism of Amit Shah
अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं आहे अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर ) हल्ला केला होता.
आता शरद पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं असून तो दिवा मी महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे असा टोला लगावला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. दरम्यान शरद पवारांच्या या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले असून, जाहीर माफीची मागणी करत आहेत.
अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शरद पवारांवर प्रहार केला होता. शऱद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत अशा शब्दांत त्यांनी जाहीर सभेतून टीका केली होती.
यानंतर भाजपा आणि शरद पवार गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात होत्या. याचदरम्यान शरद पवारांनीही अमित शाह यांना तडीपार नेते म्हटलं होतं.
यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं होतं. अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं ते म्हणाले होते. यावर आता शरद पवार यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.
“जोपर्यंत सरकार किंवा त्यांच्याकडे इनपुट नसेल तोपर्यंत अमित भाई कधीच बोलत नाहीत. हे राजकीय वार करत आहेत. पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे.
अमित शाह यांच्या व्यक्तिमत्तावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
दरम्यान शरद पवार यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, ‘आम्ही तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय’.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी याप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने अमित शाह यांना निर्दोष सोडलं आहे. खोट्या केस बनवण्यात आल्या.
दरम्यान केंद्रातील सरकार पडणार का? असं विचारण्यात आलं असता शरद पवार म्हणाले की, म्हणाले की, केंद्रातील सरकार पडणार की नाही मला माहीत नाही,
जोपर्यंत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू मोदींसोबत आहेत तोपर्यंत सरकारला अडचण नाही. आधी सत्ता मोदींच्या हातात होती आता त्यात वाटेकरी आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काही भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्हाला संविधान बदल करण्यासाठी 400 जागा हव्या आहे. आता विधानसभा निवडणुका आहे, यात लोकांना वाटत आहे की राज्यात आता बदल हवा आहे.
विधानसभा निवडणुकीला समोर जाताना एकत्र लढण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व एकत्र आले तर ठीक अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल. तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली.
यावेळी संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी जागावाटप चर्चेसाठी होणाऱ्या कमिटीचे नावं दिले अशी माहिती शरद पवारांनी दिली.
राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत काहीच नाही, निवडणुकीपूर्वी एखादा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय होईल. यापूर्वी सत्ता असताना का निर्णय घेतले का नाही?
काही लोकांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण त्याबद्दल सरसकट निर्णय घेण्याची मानसिकता आमची नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबाबत विचार करण्याचे सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं.