पोस्टाच्या बचत खात्यात घोटाळा; कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Post Office Savings Account Fraud; A case has been filed against the employee

 

 

 

भारतीय टपाल विभागाच्या डाकघरांमधील कर्मचारी बचत खात्यांसह इतर आर्थिक व्यवहारांत घोटाळे करीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

 

नवीन सिडको डाकघरात साडेनऊ लाखांच्या अपहाराच्या प्रकरणानंतर पिंपळगाव बहुला डाक कार्यालयात तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

 

याप्रकरणी संबंधित टपाल कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे नोंद असून, तीन दिवसांत दोन प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

टपाल विभागातील मनीष देवरे यांनी सातपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पिंपळगाव बहुला डाकघरातील डाकपाल संशयित योगेश भगवान तिवडे (रा. पिंपळगाव बहुला) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

 

संशयित योगेश हा सन २०१९ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्या कार्यालयात कार्यरत होता. तिथे राष्ट्रीयीकृत बँकाप्रमाणे टपाल विभागाचे बचत खात्यांचे व्यवहार सुरू होते.

 

त्यामध्ये ग्राहक प्रतिमहा ठराविक रक्कम जमा करायचे. ही रक्कम घेतल्यानंतर खाते पुस्तकावर त्याची नोंद केल्यावर खात्यात मात्र संशयित जमा करीत नव्हता.

 

सदरची रक्कम संशयित स्वत:च्या बँक खात्यात जमा करायचा. या प्रकरणात त्याने २९ लाख १० हजार दोनशे रुपयांचा अपहार केला आहे.

 

डाक विभागाच्या आर्थिक व्यवहारांचे ‘ऑडिट’ सुरू असताना ही बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राहुल नळकांडे पुढील तपास करीत आहेत.

 

दरम्यान, टपालच्या विविध डाकघरांत आर्थिक घोटाळे सुरू असल्याने यावरुन स्पष्ट होत असून टपाल विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.

 

 

नवीन सिडको टपाल कार्यालयात तीन दिवसांपूर्वी ९ लाख ३६ हजार सातशे ऐंशी रुपयांचा अपहार उघड झाला. त्यामध्ये सचिन बोरकर या संशयित डाक सहाय्यकाविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

 

दरम्यान, संशयिताने स्वत:सह पत्नीच्या नावे पन्नास रुपयांची आरडी (रिकरिंग डिपॉझिट) सुरू केली. मात्र, त्या कागदपत्रांत फेरफार करुन पन्नासऐवजी त्याने पाच हजार रुपये अशी फेरफार केली.

 

त्याच्या आर्थिक व्यवहारांतही त्याने घोळ केला. हे प्रकरणदेखील ‘ऑडिट’मध्ये उघड झाले आहे. त्यासंदर्भात अंबड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *