अजित पवारांनी पहिल्यांदाच सांगितले लोकसभेतील पराभवाचे कारण
Ajit Pawar for the first time told the reason for defeat in Lok Sabha

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होत्या. तर खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार होत्या.
दोघांमध्ये काँटे की टक्कर झाली. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला. बारामतीच्या जागेसाठी महायुतीकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती.
पण तरीही सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. हा पराभव अजित पवार यांच्या गटाला खूप जिव्हारी लागला.
या पराभवानंतर पराभवास कोण कारणीभूत ठरलं, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अखेर या सगळ्यांवर पूर्णविराम देण्यासाठी अजित पवार
यांनी भर कार्यक्रमात आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं. बारामतीचा पराभव कुणामुळे झाला? या विषयावर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचं आवाहन केलं.
बारामतीचा पराभव माझ्यामुळे झाला, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. “इथे बसणाऱ्या अनेकांनी लोकसभेला काय केलं आहे ते मला चांगलं माहिती आहे.
पण आता समोर वेगवेगळ्या रांगेत बसणारे मला भेटायला आले तर मी काही विचारत नाही. अरे बाबा पराभव माझ्यामुळे झाला आहे. बाकी कुणाचा दोष नाही,
असं करुन मी आपला शांतपणे बोलत असतो. पण मला कुणी काय बोललं, कुणी काय केलं हे सर्वात माहिती आहे. ते ठीक आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“विरोधकांच्या टीकेने आपल्याला भोकं पडत नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “एकदा धरणाबद्दल बोललो आणि कपाळाला हात लावला”, असं अजित पवार म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेनंतर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. तसेच “विकास करताना काही चुका झाल्या असतील तर ते दाखवा”, असं अजित पवार म्हणाले. तसेच “कारण नसताना माझी बदनामी करु नका”, असंदेखील अजित पवार म्हणाले आहेत.
“एकदा बोलत असताना धरणाचं बोललो आणि कपाळाला हात लावला, त्यानंतर दिवसभर चव्हाण साहेबांच्या इथे आत्मक्लेश करत बसलो.
पण नंतर परत एकदाही वेडा वाकडा शब्द तोंडामध्ये आलेला नाही ही गोष्ट लक्षात घ्या”, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी टीका करणाऱ्यांना दिलं.
तसेच “विरोधी पक्षाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीने शब्द वापरला तर काही मनला लावून घेऊ नका. आपल्या अंगाला काही भोकं पडत नाहीत.
शेवटी ज्याचात्याचा मान-सन्मान ज्याच्यात्याच्या जवळ. आपण कुणालाही आरेला कारे म्हणण्याची गरज नाही. आमच्याकडून विकास करताना काही चूका झाल्या असतील तर त्या दाखवा”, असं अजित पवार म्हणाले.
“काहींनी मला बहुरुपीच केलं. म्हणाले, मी वेगळेच कपडे घालून दिल्लीला गेलो आणि कुठे-कुठे गेलो, काय-काय केलं. कारण नसताना माझी बदनामी करु नका.
मी जिथे कुठे जातो ते उघडमाथ्याने जातो. लपूनछपून जाण्याचं कारण नाही. आपलं नाणं खणखणीत आहे”, असं अजित पवार म्हणाले.