शरद पवार-एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीवरून उद्धव ठाकरे नाराज
Uddhav Thackeray is upset over the meeting between Sharad Pawar and Eknath Shinde
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीबाबत दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार-एकनाथ शिंदे बैठक आणि शरद पवार-गौतम अदानी भूमिका याबाबत वक्तव्य केले आहे.
त्यावरुन महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही, असे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली,
त्याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत एकाप्रकारे आपली नाराजी बोलून दाखवली. शरद पवार यांनी 3 ऑगस्ट आणि 22 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
उद्धव ठाकरे दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उद्योजक गौतम अदानी यांच्याही मुद्दा उपस्थित केला. गौतम अदानी यांच्याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही,
असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत. गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.
त्यानंतर गुजरातमध्ये शरद पवार गौतम अदानी यांना भेटले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी प्रकल्पावरुन रान उठवले आहे. सातत्याने ते टीका करत आहेत.
पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा संधी मिळणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षातून बाहेर गेलेले परत येण्याऐवजी त्यांना तिकडूनच मदत करण्याचे सांगता येईल,
असे ठाकरे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनाही घेरले. देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी परतीचे दौर कापावे लागतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लगावला.
दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहे. या भेटीच्या वेळी राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे करणार आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी (शपा) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेण्यात यावा, अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे म्हटले जात आहे.