विधानसभेत महाविकास आघाडीच्या मतविभाजनासाठी महायुतीचे हे तीन प्लॅन
These are the three plans of the Mahayuti for the division of votes of the Mahavikas Aghadi in the Legislative Assembly

लोकसभेत पानीपत झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना अनेक घोषणा सुरु आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांच्या बँक खात्यात आर्थिक मदत देण्याची सुरुवात झाली आहे.
लाखो महिलांच्या बँक खात्यात कालच ३ हजार रुपये जमा झाले. मतांचं पीक काढण्यासाठी महायुती सरकारनं पेरणी सुरु केली आहे.
स्वत:साठी मतांची सोय करताना महाविकास आघाडीच्या मतांची कापणी करण्याची व्यूहनीतीदेखील महायुतीनं आखल्याचं समजतं. त्यासाठी तीन महत्त्वाचे फॉर्म्युले तयार करण्यात आले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीनं मतांची फाटाफूट करुन निवडणूक जिंकण्याचे डावपेच महायुतीनं आखले असल्याचं वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं दिलं आहे.
लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभेला एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. वंचितनं लोकसभेला स्वबळावर निवडणूक लढवली.
पण २०१९ च्या तुलनेत त्यांना झालेलं मतदान खूप कमी आहे. वंचितला झालेल्या कमी मतदानाचा फायदा अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला झाला. वंचित भाजपची बी टीम असल्याची टीका विरोधक करतात.
आता विधानसभेला मनसे, वंचितला स्वबळावर लढवून सरकारविरोधी मतांचं विभाजन करण्याचा महायुतीचा प्लान आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो.
महायुतीनं निवडणुकीसाठी दुसरा फॉर्म्युलाही तयार ठेवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचितला आघाडी करण्यास सांगून त्यांच्या रुपात तिसरा पर्याय उभा करायचा.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, वंचितचा आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गटाचा मतदार सारखाच आहे. अजित पवार गट आणि वंचितची मोट बांधून या मतदारांच्या मतांमध्ये विभाजन घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
महायुतीनं निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेल्या तिसऱ्या फॉर्म्युल्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येतात. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं
जरांगे पाटलांनी सगळ्याच्या सगळ्या २८८ जागांवर उमेदवार जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
जरांगे पाटलांनी सगळ्या मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवार दिल्यास त्याचा फायदा होईल, असा महायुतीचा कयास आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा फॅक्टर महागात पडला. मराठ्यांचं प्राबल्य असलेल्या मराठवाड्यात भाजपचे सगळे उमेदवार पराभूत झाले.
लोकसभेला सरकारविरोधी मतदान विरोधकांकडे गेलं. त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. जरांगेंनी उमेदवार दिल्यास
सरकारविरोधी मतं विभागली जातील आणि लोकसभेला मविआला मिळालेला फायदा विधानसभेला मिळणार नाही, असा महायुतीच्या नेत्यांचा होरा आहे.