राज्यात पुढील २ दिवस मुसळधार
Heavy rain for the next 2 days in the state
मुंबईमध्ये सप्टेंबर सुरू झाल्यापासून श्रावणसरींचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज होता, मात्र मुंबईत अजून तरी पावसाचा जोर फारसा वाढलेला नाही.
आज, बुधवारी पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी तसेच उद्या, गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनावेळीही महामुंबई विभागात पावसाचा जोर मोठा असण्याची शक्यता नाही.
कुलाबा येथे १ ते १० सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८.३० पर्यंत ४२.३ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९२.२ मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे.
आज, बुधवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी मुंबईमध्ये मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनाच्या वेळी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.
महामुंबई परिसरातही पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी मध्यम, तर गुरुवारी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी मुसळधार पावसाचा अडथळा नसेल, असा अंदाज आहे.
मंगळवारी मुंबई आणि परिसरात एखाद-दुसरी जोरदार सर येऊन नंतर उन्हाचे चटके मुंबईकरांनी अनुभवले. दिवसभरात कुलाबा येथे पाच मिमी, तर सांताक्रूझ येथे तीन मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाच्या अनुपस्थितीमुळे दिवसभरात कमाल तापमान चढे होते. कुलाबा येथे ३२.५, तर सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
हे तापमान सरासरीपेक्षा २.१ आणि १.१ अंशांनी अधिक होते. पाचव्या दिवसाच्या विसर्जनाच्या वेळीही कमाल आणि किमान तापमानाचा पारा चढा, म्हणजे अनुक्रमे ३२ आणि २७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
उत्तर कोकणात या काळात फारसा पाऊस नसला तरी दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी, पाचव्या दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी रायगड, रत्नागिरी
आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. गौरी विसर्जनादिवशी, गुरुवारी मात्र हा जोर कमी होऊन मध्यम सरींचीच शक्यता अधिक आहे.
दक्षिण कोकणासोबतच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये बुधवारी, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
पठारी भागामध्ये मध्यम सरींचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर,
जालना, परभणी, हिंगोली येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट अनुभवायला येऊ शकतो. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.