दोन आठवडे पाऊस नाही ;पाहा हवामान विभागाचा अंदाज
No rain for two weeks; see Meteorological Department forecast
पावसाने गेल्या आठवड्यात दिलेली ओढ येत्या आठवड्यातही कायम राहणार असून कोकण विभागामध्ये मोठ्या फरकाने सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होईल, अशी शक्यता आहे.
गुरुवारी जारी झालेल्या येत्या दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार, राज्यातही २२ ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड कायम असेल.
त्यामुळे तापमानामध्येही वाढ होण्याचा तसेच मुंबई आणि परिसरात उकाड्याचा स्तर कायम राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी अधिक आहे. कोकण विभागातही दोन ते तीन अंशांनी, तर मराठवाड्यात तीन ते चार अंशांनी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे.
सध्या वाढलेल्या तापमानाचा फटका पिकांना बसू शकतो, याबद्दल इशारा देण्यात आला आहे. विदर्भाच्या काही भागांत १५ ते २२ ऑगस्टच्या आठवड्यात पाऊस पडू शकतो.
उर्वरित राज्यात मात्र फारसा पाऊस नाही. वाढलेल्या तापमानामुळे मेघगर्जनेसह संध्याकाळच्या सुमारास पावसाची शक्यता आहे.
मुंबईमध्ये कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक नोंदवले जात आहे. वाढलेले तापमान आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता अधिक जाणवत आहे.
रत्नागिरी केंद्रावर गुरुवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. मध्य महाराष्ट्रात पुणे येथे ४.४, लोहगाव येथे ४.८, सातारा येथे ५.४ अंशांनी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.
मराठवाड्यातही छत्रपती संभाजी नगर येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक नोंदले गेले. विदर्भात ब्रह्मपुरी आणि यवतमाळ येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान मोठ्या फरकाने अधिक होते.
गुरुवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले. ३५.६ अंश सेल्सिअससह हे तापमान सरासरीपेक्षा ५.७ अंशांनी अधिक होते. चंद्रपूर येथेही ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
कमाल तापमानाची ही स्थिती कदाचित कमी-जास्त प्रमाणात २५ ऑगस्टपर्यंतही राहू शकते, असा अंदाज निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
वाढलेले तापमान, हवेतील दमटपणा जाणवून पिकांना मातीतून मिळणारे पाणी अपुरे पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. तसेच वाढत्या दमटपणातून पिकावर कीड पडू शकते.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागातर्फे शेतीसाठी वर्तवले जाणारे अंदाज आणि मार्गदर्शन याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२२ ऑगस्टनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मात्र या काळात मराठवाड्यात पाऊस फारसा नसेल. २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत विदर्भ आणि उत्तर कोकणाचा काही भाग वगळता राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 16 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 17 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून घ्यावे व खतमात्रा दिली नसल्यास खतमात्रा देण्यात यावी. पिकावरील किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीची कामे करून घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
कापूस पिकाची लागवड करून 60 दिवस झाले असल्यास कोरडवाहू कापसास 31 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 52 किलो नत्र प्रति हेक्टरी दुसरी वरखताची मात्रा द्यावी.
कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.
कापूस पिकात फुलकीडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी स्पिनेटोरम 11.7% 168 मिली किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तूर पिक 45 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या फुटतात.
तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तूर पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.
तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मुग/उडीद पिकात भुरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी सल्फर 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मका पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेस 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत बोधांना माती लावावी. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी.
आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
द्राक्ष बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत शेंडा खूडून घ्यावा.
सिताफळ बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. सिताफळ बागेस 62.5 ग्रॅम नत्र प्रति झाड खताची मात्रा द्यावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.