नागपूर हिट अँड रन, पोलिसांना हॉटेलमधील सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती
Nagpur hit and run, Police found shocking information in hotel CCTV

शहरातील हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचे नाव आल्यानंतर याप्रकरणी राजकारण तापलं असून पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर काम करत आहेत.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरमधील पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना घटनेबाबत अनेक प्रश्न विचारले होते. तसेच, या घटनेतील एफआयआरमध्ये संकेत बावनकुळेंचं नाव का नाही,
असा सवालही त्यांनी विचारला होता.दुसरीकडे सत्ताधारी भाजप पोलिसांवर दबाव आणत असल्याच्या आरोपांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खंडन केले आहे. त्यांनी म्हटले की, पोलीस चौकशीवर दबाव येणार नाही.
मी कधीही पोलिसांना फोन केला नाही, फक्त एकदा माहिती घेतली, असे बावनकुळे यांनी म्हटले. आता, याप्रकरणी ताजी अपडेट समोर आली असून सीसीटीव्ही संदर्भात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूरातील ऑडी कार अपघात प्रकरणी सीसीटीव्ही संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट
आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण हे चारहीजण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत.
संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्हमध्ये पाहण्याची सोय असून त्याचे रेकॉर्डिंग डीव्हीआरमध्ये झालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन
सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे प्रयत्न केले, तेव्हा चारही तरुण तिथे गेले असतानाही ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाल्याचे दिसून आलेले नाही.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पुढील तपासणीसाठी हॉटेलचे डीव्हीआर जप्त केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस या डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणीही करणार आहे.
त्यामुळे जर काही फुटेज त्या डीव्हीआरमधून डिलीट केले गेले असतील, तर ते नक्कीच फॉरेन्सिक चाचणीत समोर येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, लाहोरी हॉटेल ते अपघात स्थळादरम्यान तीन ते चार ठिकाणांचे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
त्यामध्ये दिसत असलेल्या चित्रीकरणाच्या आधारावर पोलिसांचा सध्याचा तपास सुरू आहे. मात्र, हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये चारही मुले दिसून न आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.
पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो, माझा असो वा सामान्य घरातील, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. फक्त आता एकच प्रश्न उरतो तो म्हणजे गाडी चालवणारा
आणि गाडीत बसणाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल होणार? पोलीस सध्या त्यादृष्टीने तपास करत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं.