मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार जाहीर
Rajya Sabha candidate of Chief Minister Shinde's Shiv Sena announced
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अशातच विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना
राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप उपमुख्मंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचा उमेदवार कोण असणार? याबाबत घोषणा केलेली नाही.
महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असली तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळं अजित पवार यांचा राज्यसभेचा उमेदवार कोण?
याबात तर्क वितर्क लढवले जातायेत. दरम्यान, भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी
आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जांगांची निवडणूक होत आहे.
या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती.
तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचं दिसल्यामुळे
भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
दरम्यान काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी
जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचं नाव आहे. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षानं राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असलेले डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांचा समावेशदेखील भाजपच्या उमेदवार यादीत आहे.
दोन निष्ठावंत आणि एक आयात असं समीकरण भाजपनं राखल्याचं दिसत आहे. अशोक चव्हाणांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
मंगळवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी नांदेडचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर उपस्थित होते. त्यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं.
अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानं पक्षासाठी नांदेडचा मतदारसंघ सेफ झाला. या मतदारसंघात काँग्रेसकडे चव्हाण यांच्या रुपात मोठा नेता होता. पण आता काँग्रेसकडे जिल्ह्यात तुल्यबळ नेता नाही.
महाविकास आघाडीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असलेला नेता नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघ भाजपकडेच राहण्याची शक्यता वाढली आहे.
लोकसभेचे खासदार प्रताप चिखलीकर भाजपचे आहेत. आता त्यांच्या साथीला अशोक चव्हाण असतील. ते राज्यसभेचे खासदार असल्यानं त्यांचाही निधी जिल्ह्यात वापरला जाईल.
भाजपनं राज्यसभेसाठी संधी दिलेले अजित गोपछडेदेखील नांदेडचे आहेत. त्यामुळे त्यांच्या रुपात नांदेडला तिसरा खासदार मिळाला आहे. गोपछडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलं आहे. भाजपचे बीड जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ते काम करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांची जडणघडण झाली आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील बोरगाव हे त्यांचं मूळ आहे.