उद्धव ठाकरेंची मविआत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतुन माघार ?
Uddhav Thackeray's resignation from the race of chief minister?

‘मी माजी मुख्यमंत्री आहे. माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न तेव्हाही नव्हते, आताही नाही. जनता हीच माझी सत्ता. या सत्तेतून मी निवृत्त होणार नाही. मला कीणीही निवृत्त करू शकत नाही,’
असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची ठाकरे यांची मागणी
आणि त्यावर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), काँग्रेस पक्षाने घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे या पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘सरकारी कर्मचाऱ्यांनी साथ दिली नाही, तर सरकार चालू शकत नाही. तुम्ही घरोघरी जाऊन सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम करता. मात्र, त्याचे श्रेय ते घेत आहेत.
सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात, तरी योजनेच्या पोस्टरवर छायाचित्रे दाढीवाल्याची लागतात’, असे सांगत उद्धव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.
नगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये ‘जुनी पेन्शन संघटने’च्या वतीने आयोजित अधिवेशनात ठाकरे बोलत होते. मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाण्यासाठी ठाकरे शिर्डीत आले होते. प्रारंभी त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
‘करोनाकाळात तुम्ही सगळ्यांनी जिवावर उदार होऊन कामे केली, म्हणून महाराष्ट्र वाचला. तरीही हे सरकार तुम्हाला हक्काचे पेन्शन देत नाही.
तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्यातच जमा आहे. आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना मी अंमलात आणतो. मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो आहे.
माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले आणि वडीलही चोरले आहेत. तरीही तुम्ही माझ्याकडे मागत आहात. मला सत्तेची पर्वा नाही,
मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. मी ती पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला न्याय देणार,’ असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप येत्या आठ ते १० दिवसांत पूर्ण होणार असून, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात,
अशी शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना वर्तवली. ही निवडणूक दोन टप्प्यांत होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
‘महिलांना दीड हजार रुपये देण्याबरोबरच त्यांची अब्रूही वाचवली पाहिजे’, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी रविवारी राज्य सरकारला लक्ष्य केले.
देशात गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. कांदा निर्यातबंदीमुळे उत्पादक पूर्णतः हवालदिल झाला आहे. तीच परिस्थिती ऊस उत्पादक व इतर शेतकऱ्यांची झाली आहे,’असे टीकास्त्र त्यांनी सोडले.