देशात NEET मध्ये टॉप रॅंक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
A student who secured top rank in NEET in the country commits suicide
दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल काँलेजमध्ये एका विद्यार्थाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नवदीप सिंह असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने पारसी अंजुमन गेस्ट हाऊसमध्ये स्वत:ला फाशी लावून घेतली.
विशेष म्हणजे नवदीपने 2017 मध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट यूजीमध्ये संपूर्ण देशात ऑल इंडिया 1 रॅंक मिळवला होता. सध्या तो रेडिओलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेत होता.
सन 2017 मध्ये राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा मध्ये नवदीप सिंहने 697 गुण मिळवून पहिला रँक मिळवला होता. पंजाबच्या मुक्तसर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवदीप माझा फोन उलचत नव्हता. म्हणून मी त्याच्या एका मित्राला त्याला पाहण्यासाठी पाठवले. त्यावेळी हॉस्टेलमधील रुमचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याला आढळले.
यानंतर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा नवदीपने फाशी लावून घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येचे प्रकरण नोंद करुन घेतले आहे. आतापर्यंत नवदीपकडे कोणतेही सुसाईड नोट सापडले नाही.
पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नवदीपचे वडील गोपाल सिंह हे पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्याच्या सरायनागा गावात सरकारी सिनियर सेकेंडरी शाळेत मुख्याध्यापक आहेत.
पोलिसांनी नवदीपची रुम सील केली आहे. तसेच त्याचा मोबाईलदेखील ताब्यात घेण्यात आलाय. नवदीपने का आत्महत्या केली? याचे कारण अद्याप समोर आले नाही.
पोलीस त्याच्या मित्रांकडे चौकशी करत आहेत. मौलाना आझाद मेडिकलच्या डॉक्टरांनी नवदीपच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले. काँलेजनेदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त करत नोटीस जारी केली आहे.