छगन भुजबळांच्या विरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला?
Chhagan became Sharad Pawar's candidate against Bhujbal?
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच नेते वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन, पक्षातून तिकीट मिळावं यासाठी फिल्डींग लावत आहेत.
सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असून दररोज शरद पवार यांच्या भेटीसाठी रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यातच, आपल्याला सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू आहे.
शरद पवारांचे विश्वासू शिलेदार राहिलेल्या छगन भुजबळ यांनीही ऐनवेळी अजित पवारांची साथ देत मंत्रिपद स्वीकारले. त्यामुळे,
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरूद्धही शड़्डू ठोकण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन
येवला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे, येवला मतदारसंघात कुणाल दराडेंना उमेदवारी भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली.
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि त्यांचे पुतणे कुणाल दराडे आणि जयंत पाटील यांच्यात वीस मिनिटं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.
कुणाल दराडे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
याआधी देखील एकदा दराडे कुटुंबीयांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. आता, ऐन निवडणुकांच्या तोंडावर भेट घेतल्याने येवला मतदारसंघातून त्यांची महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या येवला विधानसभेची जागा आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडी ही विद्यमान जागा असणार आहे.
तर, महाविकास आघाडी देखील ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात जाईल. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात कोण असेल, छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
त्यातच, आज कुणाल दराडे यांनी भेट घेतल्याने दराडे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगणार असल्याचे दिसून येते. कारण, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा मिळाल्यास कुणाल दराडे तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आमनेसामने आले आहेत. त्यातच, मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबलांना आव्हान दिले आहे.
तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम येवला मतदारसंघात झाल्यास कुणाल दराडे यांची उमेदवारी छगन भुजबळांसाठी आव्हानात्मक ठरू शकते.