दाट धुकं अन् कडाक्याची थंडी
Dense fog and bitter cold
उत्तरेकडील राज्यांमध्ये सातत्यानं वाढणाऱ्या थंडीच्या कडाक्यामुळं राज्यातही आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून उत्तरेकडून येणारे कोरडे वारे
आणि शीतलहरी अतिशय वेगानं महाराष्ट्राच्या सीमाही ओलांडून येत असल्यामुळं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.
राज्यातल सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे आणि परभणी इथं करण्यात आली असून, इथं हा आकडा 10.5 अंशांवर पोहोचला आहे. येत्या 24 तासांमध्ये तापमानात चढ- उतार अपेक्षित असून,
हा सर्व उत्तर भारतातील थंडीचाच परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशातही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी क्षेत्रामध्ये पावसाचं सावट वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्ये तापमानात घट नोंदवली जात आहे.
दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हवामानातील दमटपणा कायम राहणार असून, सकाळच्या वेळी उष्मा जाणवणार आहे. पण, रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र बोचरी थंडी जाणवण्यास सुरुवात होईल.
राज्याच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पहाटेच्या वेळी आणि सूर्य डोक्यावर आला तरीही धुक्याची चादर कायम राहणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर या भागांचा समावेश आहे.
पुढील 24 तासांमध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा पारा आणखी उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामन विभागाच्या माहितीनुसार, सोमवारनंतर मुंबई शहर,
ठाणे, नवी मुंबई क्षेत्रात तापमान घट नोंदवली जाईल. तर, मंगळवारी आणि बुधवारीही तापमानात घट अपेक्षित आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत तरी थंडी काढता पाय घेणार नाही हेच चित्र इथं स्पष्ट होत आहे.