अधिवेशनात गाजला परभणी,बीड चा मुद्दा ;मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
The issue of Parbhani and Beed came up in the session; Chief Minister Fadnavis gave an answer.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली.
तर दुसरीकडे परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती.
याप्रकरणी आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत परभणीत आंदोलन केले होते. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही करण्यात आली. या दोन्हीही घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
बीडमध्ये, परभणी मधील घटना अतिशय गंभीर आहेत. बीडमध्ये तरुण सरपंचाची हत्या झाल्याचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. पीआयला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
इन्चार्ज पीएसआयला सस्पेंड केले आहे. तिघांना अटक केलीय. काही आरोपी फरार असले तरी त्यांना शोधून निश्चित अटक करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
“आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडत आहे.
त्यातच आता सभागृहात विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवर घेरायला सुरुवात केली. यात बीड आणि परभणीत झालेल्या घटनांचा समावेश आहे.
आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत.
या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता.
विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत, यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.
यावेळी विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी.
तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. या गंभीर हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड
यांचा सहभाग असल्याची येथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा,
अशी मागणीही दानवे यांनी आज परिषद सभागृहात केली. यावर देवेंद्र फडणवीसांनी आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.