ईव्हीएममध्ये घोटाळा;कॉग्रेस नेते नसीम खान यांनी भरले फेरमोजणीसाठी पैसे
EVM scam; Congress leader Naseem Khan paid money for recount

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेसला राज्यभरात केवळ 16 जागांवर यश मिळालं आहे.
त्यामुळे काँग्रेसकडून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे चांदिवली मतदारसंघाचे उमेदवार नसीम खान यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
नसीम खान यांचा चांदिवली मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. त्यांना आपल्या निकालावर संशय आहे. त्यामुळे नसीम खान यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी साडे 9 लाख रुपये मोजल्याची माहिती आहे.
“गेल्या तीन दिवसात लोक सांगत आहेत की आम्ही काँग्रेसला मतदान केले. त्यामुळे पाच टक्के मशिन तपासण्यासाठी मी पैसे भरले आहेत. एक अजून शंका आहे की, महायुतीला मतदान अचानक वाढले आहे.
अचानक काही बूथवर युतीला मतदान वाढले. त्यामुळे आम्हाला शंका आहे की काही तरी गडबड आहे”, अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली आहे.
“७६ लाख मतदान वाढले ते कुठून आहे? लोकशाहीची हत्या होत असेल तर आम्ही बोलणार, अनेक एक्सपर्ट तक्रार करत आहेत. राजकीय पंडित बोलत आहेत. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्याला वाटते.
हा निर्णय सामुहिकरित्या निकालानंतर घेऊ हे ठरले होते. त्यामुळे त्यावर आता बोलण्यात अर्थ नाही. आज कुणावर मी असा आरोप करणार नाही.
आम्ही सगळ्यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे जो निकाल आला तो आला”, असंही नसीम खान यावेळी म्हणाले.
दरम्यान, नागपुरातील काँग्रेस उमेदवारांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. विदर्भातील काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी तर माध्यमांसमोर नाना पटोले हे आरएसएसचं काम करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या प्रचारसभेसाठी नागपुरात आल्या
पण नाना पटोले त्या रॅलीत हजर नव्हते, अशी टीका बंटी शेळके यांनी आज केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरु आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.









