नियमांच्या चौकटीत माणुसकी जपणारा अधिकारी शेख सिकंदर अली

Sheikh Sikandar Ali: An officer who upholds humanity within the framework of rules.

 

 

स्वारातीम विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधीक्षक शेख
सिकंदर अली हिम्मत अली यांच्या सेवापूर्तीनिमित्त…

 

एखाद्या संस्थेचा इतिहास केवळ तिच्या इमारतींमध्ये, विस्तारामध्ये
किंवा उपलब्धींच्या आकडेवारीत सामावलेला असत नाही तर त्या संस्थेच्या उभारणीत
ज्यांनी आपली उमेद, बुद्धिमत्ता आणि आयुष्यातील महत्त्वाची
वर्षे दिली, अशा माणसांच्या कामातही तो इतिहास जिवंत असतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अशाच तीन दशकांच्या वाटचालीचे एक
साक्षीदार आणि सक्रिय सहभागी म्हणजे शेख सिकंदर अली हिम्मत अली.

 

१ जानेवारी १९९६ रोजी कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक म्हणून
विद्यापीठ सेवेत दाखल झालेले शेख सिकंदर अली जवळपास ३० वर्षे ८ महिन्यांची प्रदीर्घ सेवा करून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अधीक्षक पदावरून नियत वयोमानानुसार
सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या जडणघडणीपासून ते
आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनापर्यंत झालेल्या बदलांचे प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या
अधिकाऱ्याची ही निवृत्ती आहे.त्यांच्या सेवेला आणखी एक महत्त्वाचा संदर्भ आहे.

 

विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात विद्यापीठीय कार्यसंस्कृतीचे संस्कार झालेल्या सुरुवातीच्या पिढीतील
कर्मचाऱ्यांपैकी ते एक आहेत. नव्याने आकार घेत असलेल्या विद्यापीठात काम करताना ‘हे
माझे काम आणि ते दुसऱ्याचे’ अशी काटेकोर विभागणी न करता विद्यापीठाची गरज ओळखून त्यालाच आपले कर्तव्य मानण्याची जी संस्कृती त्या काळात रुजली, तिचा ठसा सिकंदर अली यांच्या संपूर्ण सेवाकाळावर दिसून येतो.

 

कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक ते अधीक्षक अशी जबाबदारीची विविध पदे सांभाळत त्यांनी विद्यापीठाच्या पाच महत्त्वाच्या विभागांत दीर्घकाळ सेवा केली. या वैविध्यपूर्ण अनुभवामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या सर्वांगीण कार्यपद्धतीची सखोल जाण असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. शेख सिकंदर अली यांच्या
कार्यपद्धतीतील मला सर्वाधिक महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे नियम आणि माणूस यांच्यातील
समतोल साधण्याचे त्यांचे कौशल्य.

 

कार्यालयीन व्यवस्थेमध्ये अनेकदा नियम हे काम करण्याचे साधन न राहता काम टाळण्याची सूत्र बनते. सिकंदर अली या कार्यालयीन दुर्गुणापासून कायम दूर राहिले. नियमांचा आधार घेऊन कामे प्रलंबित ठेवण्याऐवजी त्यांनी नियमांच्या चौकटीतच
समस्यांवर मार्ग काढण्याला नेहमी प्राधान्य दिले. समोरच्या व्यक्तीची अडचण समजून घेऊन शक्य तेवढ्या तत्परतेने ती सोडविणे, हे त्यांच्या
कार्यशैलीचे वैशिष्ट्य राहिले.

 

ग्रंथालयातील सेवाकाळात सिकंदर अली यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान करण्याचा प्रयत्न केला. पुस्तके व नियतकालिकांच्या देयकांसह विविध आर्थिक नोंदी
त्यांनी संगणकाच्या साहाय्याने हाताळण्यास सुरुवात केली. आज हे काम सहज वाटत असले, तरी दोन-अडीच दशकांपूर्वी संगणकीकरणाचा केलेला हा प्रयोग त्यांच्या नवीन गोष्टी शिकण्याच्या आणि बदल स्वीकारण्याच्या वृत्तीचे द्योतक होता.

 

संपदा विभागात खरेदी, निविदा व देयक प्रक्रियेसह ‘अश्वमेध’ आंतरविद्यापीठीय
क्रीडा स्पर्धेच्या निविदा प्रक्रियेत सिकंदर अली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शैक्षणिक विभागात संलग्नीकरण, अभ्यासक्रम,
अभ्यास मंडळे आणि नॅक पुनर्मूल्यांकनाच्या कामात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. डिसेंबर २०१० पासून
परीक्षा विभागात निकाल प्रक्रिया, राखीव निकाल व विद्यार्थ्यांच्या परीक्षा-विषयक
अडचणी त्यांनी अचूकतेने आणि नियमानुसार हाताळल्या. ऑक्टोबर २०२४ पासून
परीक्षा-विषयक बाबींसाठी जनमाहिती अधिकारी म्हणूनही त्यांनी अतिरिक्त जबाबदारी
समर्थपणे सांभाळली.

 

विशेष म्हणजे एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतरही
त्यांच्यातील विद्यार्थी संपलेला नाही. इंग्रजी विषयात एम.ए. केलेल्या सिकंदर अली
यांनी सेवेत असतानाच कायद्याचा अभ्यास केला. २०११ मध्ये एलएल.बी. आणि २०१३ मध्ये
एलएल.एम. पूर्ण केले. एवढ्यावर न थांबता एप्रिल २०२३ मध्ये विधी अभ्यासक्रमात
पीएच.डी.साठी नोंदणी केली आणि त्यांचे संशोधनकार्य आता अंतिम टप्प्यात आहे. मराठी, हिंदी,
इंग्रजी, उर्दू आणि अरेबिक अशा विविध भाषांचे
त्यांना ज्ञान आहे.

 

विद्यापीठातील विविध समित्या, प्रशिक्षण व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सिकंदर अली यांनी सक्रिय सहभाग घेतला
आणि विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या उल्लेखनीय
सेवाकार्याची विद्यापीठाबाहेरही दखल घेत विविध संस्थांनी त्यांचा गौरव केला. सप्टेंबर २०२५ मध्ये
कै. गंगाधररावजी पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेतर्फे त्यांना ‘विशेष
पुरस्कार’, तर फेब्रुवारी २०२६ मध्ये दैनिक लोकपत्रतर्फे
‘विशेष कार्यगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित
करण्यात आले. मात्र पुरस्कारांपेक्षा सहकाऱ्यांच्या मनात त्यांनी मिळवलेली जागाही
त्याहून अधिक मोठी गोष्ट आहे.

 

कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि विद्यापीठ
परिसरातील शिक्षक-प्राध्यापक यांच्याशी सिकंदर अली यांनी अत्यंत आत्मीय आणि
अनौपचारिक संबंध निर्माण केले. प्रशासकीय पदामुळे येणारा औपचारिकपणा त्यांच्या
व्यक्तिगत संबंधांमध्ये फारसा जाणवत नाही. अधिकाराचा रुबाब दाखविण्यापेक्षा
संवादातून काम करणे आणि सहकाऱ्यांना सोबत घेणे ही त्यांची शैली राहिली.

 

सार्वजनिक संस्थांमध्ये दोन प्रकारचे अधिकारी
आपल्याला भेटतात. काही अधिकारी आपल्या टेबलावर आलेल्या प्रत्येक प्रकरणात अडचण
कुठे आहे हे शोधतात, तर काही जण मार्ग कुठे आहे हे शोधतात. शेख सिकंदर अली
दुसऱ्या प्रकारात मोडतात.

 

नियम मोडायचा नाही आणि माणूसही मोडू द्यायचा नाही, ही
त्यांच्या प्रशासकीय कार्यशैलीची खरी ओळख म्हणता येईल. तीन दशकांहून अधिक काळ
एखाद्या विद्यापीठात  काम करतांना विद्यार्थ्यांच्या
अनेक पिढ्यांशी त्यांनी नाते निर्माण केले. या काळात कुलगुरू बदलले, अधिकारी बदलले, सहकारी बदलले, विद्यापीठाचे
स्वरूप विस्तारले, कागदी कार्यालये संगणकीकृत झाली, परीक्षा पद्धती बदलल्या, नियम-कायदे बदलले तथापि  या सगळ्या बदलांच्या प्रवाहात विद्यापीठाबद्दलची
निष्ठा आणि आपल्याकडे काम घेऊन आलेल्या माणसाबद्दलची संवेदनशीलता त्यांनी अत्यंत
कसोशीने जपली.

 

३१ ऑगस्ट २०२६ रोजी ते अधीक्षक पदावरून निवृत्त होत
आहेत. उद्या त्यांची  जागा अन्य कुणी घेईल.
दैनंदिन प्रशासकीय व्यवहार नेहमीप्रमाणे पुढे सुरू राहील. पण काही माणसे निवृत्त
झाल्यानंतरही तेथून जात नसतात तर  त्यांनी
निर्माण केलेल्या कार्यसंस्कृतीत, त्यांनी सोडवलेल्या प्रश्नांत, सहकाऱ्यांशी
निर्माण केलेल्या नात्यांत आणि असंख्य माणसांच्या स्मरणात ती कायम आपले घर करतात.
शेख सिकंदर अली हिम्मत अली यांची विद्यापीठातील सेवा याच अर्थाने महत्त्वाची आहे.
विद्यार्थीदशेपासून माझे अत्यंत जवळचे स्नेही असलेल्या माझ्या या मित्राची पुढील
वाटचाल त्यांच्या आजवरच्या प्रवासाइतकीच आनंददायी आणि समाजोपयोगी राहो, हीच त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त मनःपूर्वक सदिच्छा.

 

— डॉ. राजेंद्र गोणारकर
माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
९८९०६१९२७४

Related Articles