अजित पवार गटाचा मोठा नेता म्हणाला ;शरद पवारांसमोर जाण्याची माझी हिम्मत नाही
Senior leader of Ajit Pawar group said; I have no courage to go in front of Sharad Pawar
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.
त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून भाजपला एकामागे धक्के दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली.
या पाठोपाठ हर्षवर्धन पाटील यांनीदेखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते
आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी संपर्कात असण्याचं कोणीही सांगणार नाही. ज्या दिवसापासून मी पवार साहेबांपासून बाजूला आलो. त्यानंतर मी त्यांच्यासमोर गेलो नाही.
त्यांच्यासमोर जाण्याची माझी हिंमत होत नाही. शेवटी त्यांच्यासमोर जाताना खूप प्रगल्भता असावी ती माझ्यात नाही, असे त्यांनी म्हटले.
तर नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी मी महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे. माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील.
शरद पवारांनी जर संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे गोकुळ झिरवाळ शरद पवार गटात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याबाबत विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, तो माझ ऐकेल. तो कुठेही जाणार नाही. अजून शर्यत लागायची आहे. शर्यत लागल्यावर तो माझ्या मागे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारने धनगड जातीचे दाखले रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार आहोत.
आमच्यातील बोगस दाखले देखील रद्द करा, अशी आमची मागणी होती. तेव्हा मात्र सरकारने हे आमच्या अधिकारात नसल्याच सांगत हात झटकले होते.
मग आता सरकारने हा निर्णय कसा घेतला? याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले.