अजित दादांनी उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारानेच हाती घेतली तुतारी
The candidate announced by Ajit Dada took up the trumpet
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. राज्यभरातील विविध मतदारंसघात सर्वच नेत्यांचे दौरे आणि मेळावे सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे.
आता आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज (१४ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.
आमदार दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी देखील जाहीर केली होती. मात्र, तरीही दीपक चव्हाण यांनी शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फलटणमध्ये मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज संजीवराजे नाईक निंबाळकर आणि
आमदार दीपक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश शरद पवारांच्या उपस्थित फलटणमध्ये पार पडला आहे. तसेच आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी कोणतीही भूमिका घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
“आता शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय झाला आहे. मी शरीराने एका बाजूला होतो आणि मनाने एकीकडे होतो. खरं म्हणजे हा निर्णय मी घेण्याऐवजी कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे.
साम, दाम, दंड भेद वापरा असं दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलेलं. पण आपण दिल्लीसमोर झुकणारे नाहीत. आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे”, असं संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात जाणार असल्याच्या चर्चा चालू होत्या.
खुद्द शरद पवारांनीही इंदापूरमध्ये भाषणात केलेल्या सूचक विधानामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षबदलाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. आता खुद्द त्यांनीच यासंदर्भात स्पष्ट भाष्य केलं असून
आता महायुतीबरोबर काम करण्याची आपली इच्छा नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर महायुतीचा प्रचार करणार नाहीत, असं बोललं जात आहे.