निवडणूक जाहीर होताच महायुतीतील एक पक्ष बाहेर ,स्वबळावर लढण्याची घोषणा !
As soon as the election is announced, one of the parties in the Grand Alliance announced to fight on its own!

विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती.
गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती.
पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत.
महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीला रामराम केल्यानंतर आता महादेव जानकर यांचा पक्ष राज्यात किती जागा लढवणार हे पाहावं लागेल. परंतु महादेव जानकरांच्या या निर्णयामुळे
महायुतीला मात्र मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. आता भाजप आणि महायुतीकडून जानकरांची नाराजी दूर केली जाणार का हे पाहावं लागेल.
महायुतीतून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून
आपण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रात 288 जागा लढवण्यासाठी आपण तयारी करत असल्याचं जानकर म्हणाले.
महादेव जानकर म्हणाले की, “लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती. पण आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी आम्ही तयारी करत आहोत.
राज्यातील 200 मतदारसंघामध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त 88 जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मतं घेऊ. काही ठिकाणी 10 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊ.”