शाळा, कॉलेजसह हॉटेल बंद, ‘दाना’चक्रीवादळाचा कोणत्या राज्याला धसका
Schools, colleges and hotels closed, which state was hit by Cyclone Dana?
अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. आज वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हवामान प्रचंड खराब आहे.
सध्या चक्रीवादळाने अंदमानचा समुद्र सोडला असल्याने केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळाचा परिणाम कमी झाला आहे.
मात्र सध्या हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीत आहे. उद्या, 24 ऑक्टोबर रोजी सकाळी हे वादळ ओडिशा मध्ये पुरीच्या समुद्रकिनारी धडकू शकतं.
दरम्यान आज वादळाच्या प्रभावामुळे ओडिशात ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. उद्या वादळ किनारपट्टीजवळ धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
त्यामुळे ओडिशा सरकारने रहिवासी आणि पर्यटकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. तसेच, स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरातच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
ओडिशाचे विशेष मदत अधिकारी देव रंजन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी पुरीच्या किनारपट्टीवर धडकेल.
त्यामुळे किनारी भाग रिकामा करण्यात आला आहे. 14 जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज, अंगणवाडी-कार्यालये बंद आहेत. मात्र कर्मचारी, डॉक्टर, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुरीहून पर्यटक बाहेर पडले आहेत, तेथील हॉटेल्सची बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. कार्तिक स्नानासाठी पुरीत पोहोचलेल्या 5 हजार महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ओडिशा राज्य आपत्ती दलाच्या 51, अग्निशमन दलाच्या 178 आणि एनडीआरएफच्या 10 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
खराब हवामानामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आपला 3 दिवसांचा ओडिशा दौरा पुढे ढकलला आहे. मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यांजवळ न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.
जवळपास 750 मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असेल. भारतीय तटरक्षक दल , आर्मी,
वायुसेना आणि नौदलाला अलर्ट मोडमध्ये ठेवण्यात आले आहे. हवाई दलाची विमाने आणि नौदलाची जहाजे जवळपास घिरट्या घालत राहतील असे समजते.
ओडिशासह पश्चिम बंगालमध्येही दाना चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल. त्यामुळे पश्चिम बंगालमधील 9 जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे पुढील 3-4 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
तसेच लोकांना घरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी आणि जवानांची सुट्टी रद्द झाली आहे. दिघा, पूर्व मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातून 1.50 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
वादळाच्या प्रभावामुळे समुद्रात उंच लाटा उसळतील आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीचा भागही रिकामा करण्यात आला आहे.
पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमार आणि खलाशांना हवामानाच्या सूचना आणि सुरक्षितता सल्ला देण्यासाठी हल्दियामध्ये हेलिकॉप्टर आणि रिमोट ऑपरेटिंग स्टेशन तैनात आहेत. एनडीआरएफच्या 9 तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणार आहे. याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD ने इशारा दिलाय की,
चक्रीवादळ दाना गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येणार आहे.
चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की,
दाना नावाचे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल आणि 24 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर पोहोचेल. IMD ने ओडिशा आणि पश्चिम बंगाल तसेच देशातील इतर अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.
दाना चक्रीवादळामुळे पुरी, भद्रक, केंद्रपारा, जगतसिंगपूर आणि कटकमध्ये 100 ते 110 किमी प्रति तास वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, दक्षिण 24 परगना आणि उत्तर 24 परगणा या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पारादीप आणि हल्दिया बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओडिशातील भद्रक, बालासोर, जाजपूर, केंद्रपारा, कटक, जगतसिंगपूर, रायगडा, गजपती, गंजम, कंधमाल, नयागड, रितिकसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याच वेळी, हवामान खात्याने असेही म्हटले आहे की कोलकाता, हावडा, हुगली, उत्तर 24 परगणा, पुरुलिया आणि बांकुरा जिल्ह्यात 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 23 ऑक्टोबरपासून ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास असेल. नंतर 24 ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते 25 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तो 120 किलोमीटर प्रतितास होईल.
आयएमडीचे महासंचालक यांनी सांगितले की, वादळ येण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबरपासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
24-25 ऑक्टोबर रोजी ओडिशा व बंगालच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी 30 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.