काँग्रेस आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
Congress MLA joins Shinde group

राज्यभरात दिवाळीचे फटाके फुटत असतानाच राज्यातील राजकारणातही फटक्यांची आतषबाजी सुरू आहे. आज काँग्रेसमध्ये दोन मोठे राजकीय भूकंप झाले आहेत.
मुंबईत काँग्रेसचे अत्यंत जुने आणि अभ्यासू नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. रवी राजा यांनी आज थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने सायन-कोळीवाडा मतदारसंघातील गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. कोल्हापूरच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने कोल्हापूर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जयश्री जाधव यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने
शिंदे गटाचं बळ वाढलं आहे. जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं आहे. जयश्री जाधव यांच्या प्रवेशामुळे कोल्हापुरात शिवसेनेची ताकद वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
जयश्री जाधव यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. जयश्रीताई कोल्हापुरात मोठं संघटन उभं करतील.
महिलांच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देतील. त्यामुळे माझ्या माता, भगिनींना लाभ मिळेल. त्याचा फायदा समाजाला होईल. पक्षाला होईल.
सत्यजित जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते उद्योगजगताशी संबंधित आहेत. व्यावसायिक आणि उद्योजकांशी आपली नाळ जुळली आहे.
या व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी सत्यजित यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आज जिल्ह्यात पाच एमआयडीसी आहेत. त्या अजून वाढतील. दोन्ही प्रवेशाने कोल्हापुरात शिवसेना मजबूत होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गेल्या वर्षीची दिवाळी आणि या वर्षीची दिवाळी यात खूप फरक दिसला. लोकांमध्ये उत्साह, जल्लोष आहे. आम्ही सामान्य घरातील प्रत्येक माणसाला काही ना काही लाभ मिळायला पाहिजे
ही भावना ठेवली. त्यामुळे चांगली दिवाळी होत आहे. यापुढची दिवाळी दसपटीने चांगली होणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
महायुती महायुती महायुतीच जिंकणार आहे. दुसरा कोणी जिंकणार नाही. सुडाने पेटलेले लोक, स्वार्थाने भरलेले लोक, अहंकाराने भरलेल्या लोकांना जनता घरी बसवणार आहे.
त्यांचं काम आणि आमचं काम पाहा. होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी. आम्ही अडीच वर्ष काम केलं. आम्ही रिपोर्ट कार्ड दिलं आहे.
रिपोर्टकार्ड द्यायला हिंमत लागते. त्यामुळे जिंकणार आम्हीच. इलाका किसी का भी हो, धमाका हम ही करेंगे, असं मुख्यमंत्री म्हणाले.