महायुती अन् मविआचं टेन्शन वाढलं;पाहा कुठे कुठे बंडखोरी?
The tension between Mahayuti and Mavia increased; see where the rebellion is?
आज विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे. राज्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या
राजकीय परिस्थितीमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत
यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. काही ठिकाणी यश आलं मात्र अनेक ठिकाणी बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत.
त्यामुळे आता अनेक विधानसभा मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होणार असून, याचा मोठा फटका हा अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. कमल व्यवहारे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राजू तीमांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
तर सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातून मविआकडून अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मालेगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. मालेगावात बंडूकाका बच्छाव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
तर भाजपचे बंडखोर उमेदवार कुणाल सूर्यवंशी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठीकाणी आता अद्वय हिरे, दादा भुसे आणि बंडूकाका बच्छाव अशी तिरंगी लढत होणार आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी पचपाखडी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे न घेतल्यानं या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.