AI एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागा घटणार ?इंडिया आघाडीच्या जागा वाढणार ?
Will BJP's seats decrease in AI exit poll? India's leading seats will increase?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान होताच शनिवारी सर्व एक्झिट पोलचे अंदाज प्रसिद्ध झाले. यानंतर रविवारी झी न्यूजनं इंडिया कन्सोलिडेटेडच्या सहकार्यानं
केलेला देशातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित एक्झिट पोल जाहीर केला. त्यानुसार देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज आहे.
देशातील पहिल्या एआय आधारित एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी एनडीएला ३०५ ते ३१५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला १८० ते १९५ जागांवर यश मिळू शकतं.
एआय आधारित एक्झिट पोलसाठी झी न्यूजनं तब्बल १० कोटींच्या सॅम्पल साईजचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे. या सर्व्हेनुसार अन्य पक्षांना ३८ ते ५२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
झी न्यूजनं इंडिया कन्सोलिडेटेडच्या मदतीनं केलेल्या एआय सर्वेक्षणासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरील कमेंट्सचा अल्गोरिदमद्वारे आढावा घेण्यात आला.
कमेंट्स करणाऱ्या यूजर्ससाठी निकष लावण्यात आले. हे सर्व यूजर्स १८ वर्षांवरील, स्थानिक मतदारसंघातील असल्याची खात्री करण्यात आली होती.
फेसबुकवरील ३२ लाख पोस्ट, हजारो उमेदवारांचे सोशल मीडिया प्रोफाईल, त्यावरील १० कोटी कमेंट्सचं विश्लेषण करण्यात आलं होतं.
विविध संस्थांच्या आणि एआय एक्झिट पोलमध्ये काही राज्यांच्या अंदाजात बरीच तफावत असल्याचं दिसतं. उत्तर प्रदेशात एनडीएला ८० पैकी ६५ ते ७० जागा मिळतील, तर इंडियाला ८ ते १० जागा मिळतील असे अंदाज बऱ्याच संस्थांनी वर्तवले आहेत.
पण एआयच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ५२ ते ५८, तर इंडियाला २२ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. बिहारमध्ये सर्वच संस्थांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये २९ ते ३३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली.
इंडियाला ७ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. एआय पोलमध्ये मात्र दोन्ही पक्षांना १५ ते १५ जागा मिळू शकतात.
एआय एक्झिट पोलचा वापर याआधी अमेरिका, अर्जेंटिना, मेक्सिको, ब्राझील आणि सायप्रसमध्ये झाला आहे. या पोलची अचूकता ८० टक्के असल्याचा दावा करण्यात येतो.
महाराष्ट्रातही एनडीएला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीएची टॅली 41 वरुन 26 ते 34 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीची टॅली 5 वरुन 15 ते 21 वर जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीतही इंडिया आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळतील असा अदांज आहे. गेल्यावेळी इंडिया आघाडीला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपच्या जागा 7 वरुन 2 ते 4 दरम्यान घटण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्येही एनडीएला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीच्या जागा 26 वरुन 15 ते 16 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीच्या जागा ० वरुन 6 ते 10 जागांवर जाण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात एनडीच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएची टॅली 28 वरुन 16 ते 22 वर घसरण्याची शक्यता आहे. तर इंडियाची टॅली १ वरुन ८ ते १२ च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे.
पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढण्याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडिया आघाडील 3 ते 5, एनडीएला 5 ते 7 तर इतरांना 2 ते 4 जागांचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्यावेळी काँग्रेसला 8 तर एनडीएला 4 जागा मिळाल्या होत्या.
उत्तर प्रदेशात एनडीएला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीएच्या जवळपास 8 ते 12 जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मध्ये एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या. एक्झीट पोलमध्ये 52 ते 58 जगांचा अंदाज वर्तवला जात आहे.
एनडीएच्या जागा घटणार मात्र मोदी सरकारच येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, या राज्यात एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘एक्झिट पोल नक्की किती खरं आहे यावर मला शंका आहे. कारण भारतातील मतदाता आपण कोणाला मत दिलं याबद्दल किती खरं बोलतात हे कसं ठरवणार.’ असा प्रश्न राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी उपस्थितीत केलाय.
‘शनिवारी आलेल्या एक्झिट पोलवर जर विश्वास ठेवला तर दक्षिणेकडील बदल होणार हे दिसून येत आहे. त्याशिवाय या बदलमागील कारणं पाहावे लागणार आहेत.’, असं मत राजकीय अभ्यासक प्रकाश पवार यांनी झीच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केलंय.