अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे
Ajitdad's NCP 50 manifestos for 50 constituencies

आगामी निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.
त्यातच आता विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होताना दिसत आहे. नुकतंच राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी बारामतीकरांना खास आश्वासने दिली.
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार गटाचे युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नुकतंच अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेत
त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सादर केला. यावेळी अजित पवारांनी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या ५० मतदारसंघांसाठी वेगळा जाहीरनामा सादर करणार असल्याचे सांगितले.
“या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे जाहीरनामे जाहीर होत आहे. आमचा युतीचा जाहीरनामा येत आहे. पक्ष म्हणून पक्षाचाही जाहीरनामा असावा म्हणून आम्ही काढला आहे.
आम्ही ज्या विधानसभा लढवत आहोत, त्याचाही जाहीरनामा तयार केला आहे. आम्ही बारामतीचं व्हिजन मांडलं आहे. त्याची क्लिप तुम्हाला दाखवली आहे.
युतीबाबत मुख्यमंत्र्यांनी काही कार्यक्रम सांगितले आहेत. वेगळा दृष्टीकोन ठेवून जाहीरनामा केला आहे”, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे जाहीर करणार आहोत. बाकीचे जाहीरनामे जाहीर करणार आहोत. एक पुस्तिकाही आम्ही प्रकाशित करत आहोत.
आम्ही प्रत्येक भागाच्या गरजा लक्षात घेऊन काम करत आहोत. आमदारांच्या कामगिरीबद्दल आणि उमेदवार पाच वर्षात कोणती कामे करणार आहेत याची माहिती दिली.
रहिवाशी शेतकरी कष्टकरी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि गरजा जाहीरनाम्यात दिल्या आहेत. जे शक्य आहे, जे पार पाडू शकतो त्याचाच जाहीरनाम्यात विचार केला आहे, असेही अजित पवारांनी म्हटले.
पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये नवीन रणनीती करत आहोत. एआय आधारित जाहिरात करत आहोत. त्याला प्रतिसादही मिळत आहे. ५० विधानसभा मतदारसंघासाठी
व्हिडीओ आणि गाणीही तयार केली आहे. आज बारामतीचा जाहीरनामा सादर करत आहे, त्याचा अभिमान आहे, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीला कुस्तीची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे बारामतीमध्ये महाराष्ट्रातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा आकादमी उभी करणार अशी घोषणा अजित पवारांनी केली.
या अकादमीमध्ये बॉक्सिग, कुस्ती, भालाफेक, शुटींग, पोहणे इत्यादी प्रकारचे खेळ शिकवून खेळाडू तयार केले जातील. तसेच यामध्ये आधुनिक सुविधा, वैधानिक कोचिंग आणि प्रशिक्षण महाराष्ट्रातील खेळाडूंना दिले जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
बारामतीतील शेतकऱ्यांसाठी पाच हजार कृषी अधारित फूड प्रोसेसिंग युनिटचे एक नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. यासोबतच बारामतीमध्ये लवकरच एक लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येईल,
यामुळे स्थानिकांना आजूबाजूच्या नागरिकांना रोजगार मिळेल. बारामतीत जागतिक क्रीडा अकादमी सुरू करणार आहे. पंजाब आणि हरियाणातून प्रेरणा घेऊन अकादमी सुरू करणार आहे.
बॉक्सिंग आणि भालाफेक शिकवलं जाईल. बारामतीला पहिलं सौर ऊर्जा असलेलं शहर बनवणार आहे. बारामतीत कॅन्सरसाठी
कर्करोग रुग्णालय उभारणार आहे. कर्करोगासाठी पुणे आणि मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.