उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत बंड करू शकतील काय ?

Will Uday Samant be able to rebel in Eknath Shinde's Shiv Sena?

 

 

 

शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सध्या जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले आहेत. परंतु, त्यांच्या नावाची मुंबईसह संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

 

त्यामागचे कारण म्हणजे, भाजपा एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल आणि शिवसेनेत नवीन उदय होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (२० जानेवारी) केला आहे.

 

त्यांच्या या दाव्यानंतर राज्यात राजकीय वावटळ उठली असून शिवसेनेत पुन्हा फूट पडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही वडेट्टीवार यांच्या दाव्याशी मिळतं-जुळतं विधान केलं आहे.

“एकनाथ शिंदे यांना पर्याय म्हणून सामंत यांना पुढे आणलं जात आहे. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे २० आमदारही आहेत”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

“सध्या उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दावोसला गेले असून पालकमंत्रिपदावरून महायुतीत आधीच ठिणगी पडली आहे.

 

जर शिंदे यांचे त्यांच्या मंत्र्यांवर नियंत्रण नाही, तर ते नेतृत्व कसे करू शकतात?” असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे उदय सामंत यांनी संजय राऊतांचा दावा फेटाळून लावला असून हा राजकीय बालिशपणा असल्याचं म्हटलं आहे. “एकनाथ शिंदे यांनी राजकीय उठाव केल्यानंतर त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो.

 

मला दोनदा राज्याचं उद्योगमंत्रिपद मिळालं आहे. त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत,

 

ते मी कधीही विसरू शकणार नाही. कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांच्या वाढत्या दर्जावरून शिवसेनेत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

 

बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “राज्याचे उद्योग मंत्री हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले आहेत.

 

सरकारी खर्चातून दावोसला गेलेले उदय सामंत तिथे बसून एकनाथ शिंदे यांचेच आमदार आणि खासदार फोडत आहेत. पण, त्यांचे पितळ उघडे पडल्यामुळे ते सारवासारव करत आहेत.”

 

“उदय सामंत यांना दिल्लीचा आशीर्वाद असून पूर्ण पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना नकोसे होतील, आता ते देवेंद्र फडणवीसांनाही नकोसे झालेले आहेत”,

 

असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हे दावे उद्योगमंत्री सामंत यांनी फेटाळून लावले आहेत. पुढील तीन महिन्यांत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामील होतील,

 

असा दावाही त्यांनी केला आहे. “ठाकरे गटाचे तीन खासदार आणि पाच आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आणि लवकरच ते शिवसेनेत सामील होतील.

 

काँग्रेसचे पदाधिकारीही शिवसेनेसाठी काम करण्यास सुरुवात करतील”, असे सामंत यांनी दावोसमधून प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

उदय सामंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती. २००४ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोकणातील रत्नागिरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

 

२००९ मध्ये सामंत यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली.

 

२०१४ मध्ये सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आणि तिसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.

 

शिवसेना-भाजपाच्या युती सरकारमध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला.

उदय सामंत हे ठाकरे कुटुंबाच्या जवळचे मानले जात होते. शिवसेनेतील मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचे स्थानही वाढले होते. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी सामंत यांना शिवसेनेचे उपनेतेपद दिले.

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सामंत पुन्हा रत्नागिरीतून निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामंत यांच्याकडे उच्च

 

आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. जून २०२२ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले.

त्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये उदय सामंत यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून ओळखले जाणारे सामंत हे २०२२ मध्ये शिवसेनेचे प्रवक्ते झाले.

 

वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क यांसारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर उदय सामंत यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती.

 

२०२३-२४ दरम्यान, कोकणातील अब्जावधी डॉलर्सच्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. या प्रकल्पांमुळे कोकणातील हापूस आंबा, फणस आणि काजूच्या लागवडीवर तसेच मासेमारीवर परिणाम होईल, असं अनेकांचं मत होतं.

 

स्थानिकांचा असा दावा होता की, त्यांच्या विरोधाला न जुमानता उदय सामंत हे रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रही होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत खातेवाटप

 

आणि पालकमंत्रिपदावरून धुसफूस सुरू असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना त्यांच्या अनुपस्थितीत

 

दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे महायुतीत कुठलाही ताळमेळ नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवीन ‘उदय’ होणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *