काँग्रेसकडून १६ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई
Suspension action against 16 rebels by Congress

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांविरोधात पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
काँग्रेसने राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या १६ जणांना निलंबित केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा,
शिवाजीनगर, पर्वती, गडचिरोली, भंडारा, भिवंडी, मिरा-भाईंदर, अहमदनगर शहर, कोपरी-पाचपाखाडी, यवतमाळ, राजापूर, काटोल
या मतदारसंघातील बंडखोरांनी माघार घेतली नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईआधी काँग्रेसने अनेक बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.
काँग्रेसच्या वरिष्ठांनी केलेल्या मनधरणीनंतर काही बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर काहींनी या मनधरणीला जुमानलं नाही.
त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला.या कारवाईपूर्वी बंडखोरांना पक्षाने नोटिसा देखील बजावल्या होत्या. मात्र १६ बंडखोरांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली.