BJP कडून उमेदवारी दाखल करतांना काय म्हणाले अशोक चव्हाण ?
What did Ashok Chavan say while filing his candidature from BJP?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपाने राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. चव्हाण यांची राज्यात काम इच्छा होती पण भाजपाने त्यांना दिल्लीचा मार्ग दाखवला आहे.
काँग्रेसमधून भाजपात गेल्याने दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाणांना मोठं गिफ्ट मिळालं. आज ते उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रात ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आज उमेदवारीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानुसार, अशोक चव्हाण आज उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.
त्याआधी त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आजपासून नवीन सुरुवात मी करत आहे.
सिद्धीविनायाकाचा आशीर्वाद घेऊन मी अर्ज भरायला जात आहे.” ते पुढे म्हणाले की, “राज्यसभेची उमेदवारी मिळाली ही आनंदाची बाब आहे. राजकीय बॅकलॉग भरून निघतोय ही समाधानाची बाब आहे.”
अन्य पक्षांमधून आलेल्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्यांना राज्यसभेची खासदारकी देण्याचे प्रकार राज्यात यापूर्वीही घडले आहेत.
अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांच्यामुळे ही परंपरा कायम राहिली आहे. तर, भाजपाने अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी देऊन
त्यांना राज्याच्या राजकारणात संधी मिळणार नाही, हे स्पष्ट केले. चव्हाण यांची राज्यत काम करण्याची इच्छा होती. पण भाजपाने त्यांना दिल्लीचा मार्ग दाखवला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल.
१६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसंच, २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. तर, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, २७ तारखेलाच मतमोजणी होईल.
भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना, शिंदे गटाने मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
परंतु, ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सुतोवाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहेत. भाजपाकडून चौथा उमेदवार देण्यात येणार नसल्याने ही निवडणूक चुरशीची नसून बिनविरोध होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.