काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ,दिग्गज नेता झाला पराभूत
Congress's face for the Chief Minister's post, veteran leader defeated

नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सलग सात वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
यावेळीही काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि मनसेकडून योगेश सूर्यवंशी रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारसंघात पहिल्यांदाच तिरंगी लढत रंगली आहे.
सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड आहे. नगर जिल्ह्यातील राजकारण हे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दिग्गज घराण्यांच्या भोवती फिरत आले आहे.
दोन्ही घराण्यांचे सहकार चळवळीत मोठे योगदान आहे. कधीकाळी काँग्रेसमधील सोबती असणारे थोरात आणि विखे आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसला तरी
सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारासाठी विखे पाटलांनी जोर लावला आहे. यामुळे बाळासाहेब थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अटीतटीच्या या लढतीत बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेब राज्यातील बडे नेते आहेत. सातवेळा आमदारकी भुषवणाऱ्या थोरातांना यंदा मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी १० मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असल्याचे
सध्याच्या कलानुसार दिसत आहे. दरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल खताळ हे सध्या ५ हजार ६८ मतांनी आघाडीवर आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारासंघात आतापर्यंत ६ व्या फेरीची मतमोजणी झाली आहे. यामध्ये यंदा वारं फिरणार असल्याचे चित्र आहे. अद्याप अंतिम निकाल हाती यायचा असून पुढील फेऱ्यांत चित्र बदलण्याची शक्यता आहे.
सध्या बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत. मात्र पुढच्या काही फेऱ्यांत थोरातांचा पारडे जड होऊ शकणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.