राष्ट्रवादीला नव्या मंत्रिमंडळात मंत्रिपद नाही?अजित पवार नाराज
NCP does not have a minister in the new cabinet? Ajit Pawar is upset
दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसताना दिसत आहे. महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला
नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएच्या मंत्रिमंडळातील स्थान मिळणार नसल्याचं वृत्त आहे. भाजपच्या चार, शिंदेगटाच्या एका खासदाराला मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनादेखील पंतप्रधान कार्यालयाकडून संपर्क साधण्यात आलेला आहे. पण दादांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला १७ जागा मिळाल्या. महायुतीची कामगिरी सुमार झाली. अजित पवाराच्या राष्ट्रवादीनं ४ जागा लढवल्या. त्यातील केवळ १ जागा त्यांना जिंकता आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यांची खासदारकी राखली. ते रायगडमधून विजयी झाले. बारामती, शिरुर, धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले.
बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक हरल्या. हा पराभव अजित पवारांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
पक्ष आणि चिन्ह मिळूनही अजित पवारांना लोकसभेत चमक दाखवता आलेली नाही. तर शरद पवारांनी बारामतीचा बालेकिल्ला राखत आणखी ७ जागा जिंकत मैदान मारलं.
एनडीए मंत्रिमंडळात सहभाग होण्यासाठी भाजपच्या चार आणि शिंदेसेनेच्या एका खासदाराला फोन आला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही खासदाराला अद्याप तरी मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही.
राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. दोन दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. पण पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तरी
राष्ट्रवादीतील कोणालाही फोन आलेला नाही. लोकसभेत अजित दादांची ‘ताकद’ समजल्यानं राष्ट्रवादीला मंत्रिपद नाकारलं जातंय का, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,
मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ हजर होते. बैठक सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचले. त्यांच्या वाहनांचा ताफा निवासस्थान परिसरात पोहोचला.
त्यामुळे चर्चांना उधाण आलं. फडणवीस राष्ट्रवादीची नाराज दूर करण्यासाठी गेले आहेत की पक्ष नेतृत्त्वाचा काही मेसेज घेऊन तटकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत याची चर्चा सुरु झाली.
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्रातून सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.
महाराष्ट्रातून भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना फोन गेला आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
आरपीआयकडून रामदास आठवले पुन्हा मंत्री असतील. त्यामुळे महाराष्ट्रातून एनडीए सरकारमध्ये सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.
महाराष्ट्रातून मोदी मंत्रीमंडळात कोण कोण?
नितीन गडकरी, भाजप, विदर्भ
पियुष गोयल, भाजप, मुंबई
रक्षा खडसे, भाजप, उत्तर महाराष्ट्र
मुरलीधर मोहोळ, भाजप, पश्चिम महाराष्ट्र
रामदास आठवले, आरपीआय
प्रतापराव जाधव, शिवसेना, विदर्भ
दुसरीकडे, नारायण राणे यांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे.
राज्याचा प्रादेशिक समतोल पाहिल्यास मुंबईतून पियूष गोयल यांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातून नितीन गडकरी आणि
प्रतापराव जाधव असतील. पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ असतील. उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची भेट घेत आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी संभाव्य मंत्र्यांसह भाजपचे नेते पोहोचू लागले आहेत.
अमित शाह, जेपी नड्डा, बीएल वर्मा, पंकज चौधरी, शिवराज सिंह चौहान, किरण रिजिजू, जितीन प्रसाद, रवनीत सिंह बिट्टू, अन्नपूर्णा देवी, अर्जुन राम मेघवाल,
नित्यानंद राय, अर्जुन मेघवाल असे भाजप नेते पोहोचले आहेत. आरजेडी नेते लल्लन सिंह, रामनाथ ठाकूर, लोजप नेते चिराग पासवान हेही पोहोचले आहेत.