‘पोस्टल बॅलेट’मध्ये महाविकास आघाडीला भरघोस मते ,मात्र EVM मध्ये पराभूत
Mahavikas Aghadi wins huge votes in postal ballot, but loses in

राज्यात महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले असले प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचे निकालानंतर दिसत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महायुतीचे एक अपवाद वगळता उर्वरित सहा उमेदवार ‘पोस्टल बॅलेट’मध्ये माघारले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मात्र टपाली मतात आघाडी मिळाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय लागल्याचे मत सर्व विरोधी स्तरातून व्यक्त होत आहे. ‘ईव्हिएम’ मशीनवरही अनेक ठिकाणी शंका व्यक्त होत आहे.
काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे आदी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांनी ‘ईव्हिएम’मध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला ‘पोस्टल बॅलेट’ने बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.
महायुतीच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक टर्म आमदार राहिलेल्यांनाही कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवेत असल्याने टपाली मतदान केलेले कर्मचारी,
सीमेवरील सैनिक, घरून मतदानाचा हक्क बजावणारे ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग आदीनी टपाली मतदानातून नाकारले आहे. याचाच अर्थ महायुतीचे उमेदवार हे शासन, प्रशासनातील अधिकारी,
कर्मचाऱ्यांना योग्य मान सन्मान देत नसावेत, योग्य समन्वय ठेवत नसावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे. महायुती सरकाने निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजनांची खैरात केली. महिला,
बेरोजगार, शेतकरी, ज्येष्ठ अशा सर्व घटकांसाठी योजना देताना करदात्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गृहीत धरल्याचा संतापही टपाली मतातून व्यक्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पुसद येथून विजयी झालेले महायुतीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांनीच टपाली मतदानात आघाडी घेतली आहे. त्यांना एक हजार ७३ टपाली मते मिळाली आहे.
तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शरद मैंद यांना केवळ ४०५ मते मिळाली. समाज कल्याण विभागतील माजी अधिकारी माधव वैद्य पुसदमध्ये वंचितकडून लढले.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी राहिलेले वैद्य यांनाही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली पसंती दिली नाही. दिग्रस मतदारसंघात महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार माणिकराव ठाकरे यांना एक हजार १२८ टपाली मते मिळाली.
महायुतीचे विजयी उमेदवार संजय राठोड यांना ८१५ मते, उमरखेडमध्ये महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे यांना ७०३, तर महायुतीचे विजयी उमेदवार किसन वानखेडे यांना केवळ ४०५ मते,
आर्णी मतदारसंघात महाविकास आघाडीचे जितेंद मोघे यांना ८३३, तर विजयी झालेले महायुतीचे राजू तोडसाम यांना ५९५ मते,
राळेगावमध्ये महाविकास आघाडीचे प्रा. वसंत पुरके यांना ४९८ तर महायुतीकडून तिसऱ्यांदा विजयी झालेले प्रा. डॉ. अशोक उईके यांना केवळ ३५२ मते मिळाली.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळासाहेब मांगुळकर यांना एक हजार ८९९ टपाली मते मिळाली. पराभूत झालेले महायुतीचे उमदेवार मदन येरावार यांना ८५१ मते मिळाली.
तर वणी मतदारसंघात विजयी झालेले महाविकास आघाडीचे संजय देरकर यांना ९५९ टपाली मते मिळाली. पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना ४९५ टपाली मतांवर समाधान मानावे लागले.
टपाली मतांमध्ये बाजी मारूनही जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सातपैकी केवळ दोन उमेदवार विजयी झाले. शासन, प्रशासनातील टपाली मतांमध्ये महायुतीचे उमेदवार का माघारले, याचे चिंतन विजयी झालेल्या महायुतीच्या आमदारांनी करावे, असा सल्ला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देत आहेत.