मारकडवाडीतील महिलांनी शरद पवारांसमोरच पुकारला EVM विरोधात एल्गार
Women in Markadwadi raised slogans against EVM in front of Sharad Pawar

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार मारकडवाडीत पोहोचले असून त्यांनी तिथून लाँग मार्चला सुरुवात केली.
मारकडवाडीत शरद पवारांनी ग्रामस्थांना संबोधन केलं. तसंच, शरद पवारांसमोरच उपस्थित महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला. काही महिलांनी उत्स्फूर्त भाषणं करून शासनाला कोंडीत पकडलं आहे.
एक महिला म्हणाली, “आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं नाही.
त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. पोलिसांनी दमदाटी करून गुन्हा दाखल करू असं पोलीस म्हणत होते. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”
दुसऱ्या महिलेने कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा गजर करत ईव्हीएमविरोधात न्याय मागितला. “लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्येचा अपमान करत आहात.
तुम्ही स्वःच्या हिमतीवर अनेकांना जगवलं होतं”, असं म्हणत सदर महिला पुढे म्हणाली, “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीच्या देशभर पेटला पाहिजे.”
फक्त महिलाच नव्हे तर शाळकरी मुलीनेही ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला. ती म्हणाले, “आमच्या आमदारसाहेबांना जास्त लीड मिळायचं. पण यंदा मिळालं नाही.
त्यामुळे या शकंचे निरसन व्हावं म्हणून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली. पण, आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करू दिलं नाही. हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे, ईव्हीएम हटवा, आणि देश वाचवा”
बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत. त्यावरून गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरू आहे.
त्यांची बाजू ऐकण्यासाठी ज्येष्ठे नेते शरद पवार आज मारकडवाडी येथे पोहचले. त्यांनी ग्रामस्थांची बाजू ऐकून घेतली. त्यांचा कशामुळे विरोध आहे
याची माहिती त्यांच्याकडूनच घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी ग्रामस्थांना याप्रकरणी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर हा विषय घालण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी भाषण केले. तुमच्या मतदानाच्या विचारामुळे मी येथे यायचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगीतले. “तुम्ही असं ठरवलं आपल्या गावात फेरमतदान घेऊ. ते अधिकृत नव्हतं.
ते सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने ठरवलं. पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. हा तुमचा अधिकार होता. पण हा निर्णय तुम्ही घेतल्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली. कोणता कायदा असा आहे.
या ठिकाणी मी भाषण करतो. तुम्ही ऐकत आहेत. उद्या पोलीस खात्याने निर्णय घेतला मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हा कुठला कायदा.
असा कुठं कायदा आहे. तुम्हाला इथे जमायचं नाही. जमावबंदी. तुमच्याच गावात ही गंमतीची गोष्ट आहे. हे का केलं मला समजत नाही.” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी पवारांनी प्रशासन आणि पोलिसांवर कडक ताशेरे ओढले. त्यांच्या भूमिकेवर टीका केली. त्यांची भूमिका अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. “तुम्ही तुमच्या समाधानासाठी मतदान करायचा निर्णय घेतला.
तेव्हा सरकारची बंदी कशी येऊ शकते. तुम्ही हे केलं म्हणून तुमच्यावर खटले भरले. मला काही समजत नाही. खटला हा गुन्हा केला, चोरी केली आणखी काही केलं तर भरतात.
पण गावाने ठरवलं वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खटला? गावचे सरपंच आहे. आपले आमदार जानकर आहे. त्यांना विनंती आहे याचं रेकॉर्ड आम्हाला द्या.
जमावबंदीचंपण. इथे काय प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय घेतला त्याची माहिती आणि रेकॉर्ड. पोलिसांनी केलेल्या केसेसच्या रेकॉर्ड आम्हाला द्या.” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पवारांनी गावकऱ्यांच्या भावना, मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. “महाराष्ट्रात निवडणूक आयोग.
त्यांच्याकडे तक्रार देऊ. मुख्यमंत्री, पंतप्रधान, निवडणूक आयोगाकडेही तक्रार करू. हे कशासाठी? आपण म्हणतो म्हातारी मेल्याचं दुख नाही, काळ सोकावतो.
निवडणूक यंत्रणांचा काळ एकदा सोकावला तर तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. सर्व माहिती घ्या. तालुक्याच्या सर्व गावात ठराव करा.
आम्हाला आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको. जुन्या पद्धतीने मतदान करायचं आहे. त्या ठरावाची प्रत उत्तम जानकरांकडे द्या. आमच्याकडे द्या. त्यावर आम्ही निर्णय घेऊ. योग्य ठिकाणी पोहोचवू.” असे आश्वासन पवारांनी यावेळी दिले.