अमित शहा जाणार शरद पवारांच्या भेटीला;काय आहे कारण ?
Amit Shah will go to meet Sharad Pawar; what is the reason?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज शरद पवारांचा ८४ वा वाढदिवस आहे.
त्या निमित्तानं सकाळपासून त्यांना दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळी शरद पवारांची सहकुटुंब भेट घेतली.
त्यानंतर आता अमित शहा थोड्याच वेळात शरद पवारांना भेटणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या काही वेगळ्या घडामोडी घडणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.
आज सकाळी झालेली पवार कुटुंबाची भेट गाजली. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यापासून काका, पुतण्यामध्ये दुरावा निर्माण झाला.
तो आजच्या भेटीनं काहीसा कमी झाला. अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलं होतं. त्यामुळे पवार कुटुंबाच्या दृष्टीनंदेखील
ही भेट महत्त्वाची ठरली. त्यानंतर आता अमित शहा संसदेत पवारांची भेट घेणार आहेत. हिवाळी अधिवेशन सुरु असल्यानं सध्या शरद पवार दिल्लीत आहेत.
अमित शहांनी आज सकाळी शरद पवारांना फोन केला होता. त्यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दोन नेत्यांमध्ये बराच वेळ गप्पा झाले. शहा आणि पवार एकमेकांसोबत अनेक विषयांवर भरभरुन बोलले.
त्यानंतर आता शहा पवारांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणार आहेत. संसदेत दोन दिग्गज नेत्यांची भेट होईल. या भेटीत काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार आणि अमित शहांच्या होऊ घातलेल्या भेटीबद्दल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ‘शहा आमचे शीर्षस्थ नेते आहेत. शरद पवार देशातील मोठे नेते आहे.
त्यांचं महत्त्व खुद्द पंतप्रधान मोदींनी अनेकदा अधोरेखित केलं आहे. शहा आणि पवार भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होऊ शकते. पण काय चर्चा होईल हे आताच सांगणं माझ्यासाठी अवघड आहे,’ असं दरेकर यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा दरेकर यांनी कालच केला आहे. त्यामुळे आजच्या भेटीतून काही वेगळी समीकरणं जुळू शकतात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
त्यावर राज्याच्या हिताची कोणती समीकरणं जुळणार असतील तर चांगलंच आहे. हा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, अशी सगळ्यांचीच भूमिका आहे, असं दरेकर म्हणाले.
‘शरद पवारांनी सातत्यानं विकासाचं राजकारण केलं आहे. ज्यावेळी युतीचं सरकार आलं, तेव्हा बिनशर्त पाठिंबा देणारे पवारच होते. स्थिर सरकार हवं म्हणून त्यांनी पाठिंबा दिला होता.
आता राज्यात, केंद्रात एनडीएचं भक्कम सरकार आहे. विकास व्हावा या अँगलनं काही चांगली समीकरणं जुळत असतील तर तशी गोष्ट होऊ शकते,’ असं दरेकरांनी म्हटलं.