पंकजा मुंडे यांना भाजपच्याच नेत्यांनी पाडले ;नेत्याचा मोठा दावा
Pankaja Munde was overthrown by the leaders of the BJP; the leader's big claim

गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला होता. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून येतील,
असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केले. ते शुक्रवारी विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर भास्कर जाधव यांचे उत्तर अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
मागील दोन निवडणुका पंकजा मुंडेंचा गेम हा भाजपच्याच नेत्यांनी केला. मात्र, या निवडणुकीत त्या निवडून येतील. कारण आतापर्यंत ज्या नेत्याने पंकजा मुंडे यांचा गेम केला,
त्याच्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर त्या राजकीय नेत्याची कारकीर्दच बरबाद होईल.
त्यामुळे ते नेते पंकजा मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी नाही तर आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना निवडून आणतील, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.
महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणाचं विश्लेषण करताना भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
पंकजा मुंडे या 2014 साली भाजपचे सरकार आल्यानंतर जलसंधारण, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण अशा तीन खात्यांचा कारभार सांभाळत होत्या.
त्यावेळी पंकजा मुंडे या राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक होत्या. मात्र, नंतर पंकजा मुंडे यांचा पडता काळ सुरु झाला होता. 2019 च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता.
त्यानंतर पाच वर्षे पंकजा मुंडे यांचे विधानपरिषद किंवा राज्यसभेवर पुनवर्सन होणार, अशी केवळ चर्चा व्हायची. परंतु, प्रत्यक्षात त्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते.
मध्यंतरी त्यांच्यावर भाजपने राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी दिली होती. त्यामुळे पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून आणखी दुरावल्या होत्या.
त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड नाराज होते. अखेर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने बीड लोकसभेची उमेदवारी दिली.
मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा आताच्या विधानपरिषद निवडणुकीत विजय झाल्यास तो अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल. पंकजा मुंडे यांच्या रुपाने ताकदवान ओबीसी नेता विधिमंडळात येईल.
तब्बल 10 वर्षांनी पंकजा मुंडे यांच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागणार आहे. त्यामुळे आता सर्वांना विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता लागली आहे.