फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सर्वच मंत्री कोट्याधीश,६२ टक्के गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
All ministers in Fadnavis' cabinet are crorepatis, 62 percent have criminal backgrounds
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रिमंडळातील ६२ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यातील काही मंत्र्यांवर तर खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
राज्यातील महायुती सरकारचा रविवारी शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह ४२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले. एकीकडे राज्यात स्वच्छ
आणि पारदर्शी कारभार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील ४२ पैकी २६ म्हणजेच ६२ टक्के मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स् ’(एडीआर) आणि ‘महाराष्ट्र इलेक्श्नन वॉच’ या संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे मंत्र्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे.
महायुती सरकारमधील १७ म्हणजेच ४० टक्के मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न, महिलांशी सबंधित, फसवणूक, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भाजपच्या २० पैकी १६ म्हणजेच ८० टक्के मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातही १० मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर तीन मंत्र्यावर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद आहेत.
शिवसेनेच्या ५० टक्के म्हणजेच १२ पैकी ६ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून तीन मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, तर राष्ट्रवादीच्या १० पैकी ४ मंत्र्यावर (४० टक्के) गुन्हे दाखल असून चार मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
● महायुतीचे संपूर्ण सरकारच कोट्यधीश असून सर्वात कमी श्रीमंत असलेले शिवसेनेचे मंत्री प्रकाश अबिटकर यांची संपत्ती १.६ कोटी आहे, तर मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत मंत्री मंगलप्रभात लोढा असून त्यांची संपत्ती ४४७.०९ कोटी रुपये आहे.
●लोढा हेच सर्वात मोठे कर्जबाजारी मंत्री असून त्यांच्यावर ३०६.२२ कोटींचे कर्ज आहे.
●४२ पैकी १३ (३१ टक्के) मंत्र्यांनी आपले शिक्षण इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण झाल्याचे नमूद केले, तर २५ मंत्र्यांचे शिक्षण पदवी आणि पदव्युत्तरपर्यंत झाले आहे. चार मंत्री डिप्लोमाधारक आहेत.
●मंत्रिमंडळातील २९ मंत्री ५१ ते ८० वयोगटातील तर १३ मंत्री ५० वर्षांखालील आहेत. मंत्रिंमडळात १० टक्के म्हणजेच ४ महिलांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.