काका-पुतण्याच्या राष्ट्र्वादीत मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या भेटीला
Big developments in the uncle-nephew nationalist movement, Sharad Pawar's Shiledar meets Ajitdada
एकीकडे नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण
आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील आणि अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील यांनी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने आपण भेटायला आलो आहोत अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली .
तर रोहित पाटील यांच्या पाठोपाठ अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने भेटायला आलो असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली .
मात्र, मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक होण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. आज रोहित पाटील
आणि सलील देशमुख यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. या भेटीमागे काही राजकीय कारण नाही ना? अशा चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटची क्रेझ अजूनही पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहरातील पदाधिकारी गुलाबी रंगाचे जॅकेट घालून अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरविंद भाजीपाले हे पदाधिकाऱ्यांना घेऊन अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. इतकेच नाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील गुलाबी रंगाचा जॅकेट शिवून वापरण्यासाठी दिला आहे.