खातेवाटपात अनेक बड्या नेत्यांचे पंख छाटले
Many big leaders' wings were clipped in the portfolio allocation
हिवाळी अधिवेशाचे सूप वाजताच पुढच्या तासाभरात फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. खातेवाटपात अनेक बड्या नेत्यांना तुलनेने हलके किंबहुना कमी महत्त्वाचे खाते देऊन
त्यांचे पंख छाटण्याचे काम फडणवीसांसह अजित पवार यांनी केल्याचे बोलले जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे आदी बड्या नेत्यांची खातेवाटपात निराशा झाली आहे.
याउलट नव्या चेहऱ्यांना महत्वाची खाती देऊन फडणवीस आणि अजित पवार यांनी पक्षात योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बड्या नेत्यांचे पंख छाटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खुबीने होत असताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना यावरतीच बोलते करण्याचा प्रयत्न बारामतीत पत्रकारांनी केला. यावेळी नेहमीच्या शैलीत त्यांनी सरकारमधील नेत्यांची अंतर्गत दुखणी मनमोकळेपणे सांगितली.
महायुती सरकारचे शनिवारी रात्री खातेवाटप झाले. कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे, दुसरीकडे राज्यमंत्री फक्त सहा आहेत. प्रत्येक मंत्र्याला एक एक खाते देण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे.
त्यामुळे काही जण खूश आहेत तर काही जण नाराज आहेत, असे अजित पवार म्हणाले. परंतु मंत्र्यांची संख्या जास्त असल्याने एक एक खाते द्यावे लागल्याचेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपात गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार यांना कमी महत्त्वाची खाती दिल्याचे बोलले जात आहे.
तर प्रथमच मंत्री झालेल्या शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांना सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामविकास अशी अतिशय महत्त्वाची खाती दिल्याने त्याचीही चर्चा होत आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिखात्यासारखे महत्वाचे खाते होते, मात्र यंदा मंत्रिमंडळात नवख्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषि खाते देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला.
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे गृह खाते ठेवले आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली आहे.