भाजपच्या “या” नेत्याने केला विधानसभा निवडणुकीत EVM घोटाळा, जानकरांनी थेट नावच संगितले
"This" BJP leader committed EVM scam in assembly elections, Uttam Jankar directly named him

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून महायुतीचा विजय झाल्याचा गंभीर आरोप याआधी केला आहे.
आता मोहित कंबोज यांनी ईव्हीएम घोटाळा केल्याचा सनसनाटी दावा उत्तम जानकर यांनी केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून
भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तम जानकर यांच्यावर पलटवार केलाय. जानकर हे अपघाताने आमदार झालेत, असे विखे पाटलांनी म्हटले आहे.
ईव्हीएम मशीनची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावर होती आणि त्यांनीच ईव्हीएम घोटाळा केल्याचा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे. मारकडवाडी येथील आंदोलनानंतर सातत्याने जानकर हे ईव्हीएम घोटाळ्यावर बोलत आहेत.
मात्र त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमवर पुराव्याशिवाय आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगितल्याने मारकडवाडी येथील विषय मागे पडला होता.
आता पुन्हा एकदा आमदार उत्तम जानकर यांनी मोहित कंबोज यांनी फडणवीस व बावनकुळे यांना उचलताना जे शब्द वापरले होते, त्यावरून आरोप केलेला आहे. ईव्हीएमची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावर होती
आणि त्यांनीच हा घोटाळा केल्याचा ठपका जानकर यांनी ठेवला आहे. मोहित कंबोज यांनी 120 हा शब्द वापरला होता. त्यावरून जानकर यांनी
हा घोटाळा असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. हे सरकार पुढच्या तीन ते चार महिन्यात जाणार याचा मला विश्वास असल्याचाही दावा जानकर यांनी केला आहे.
तर दुसरीकडे उत्तम जानकर हे अपघाताने आमदार झाले आहेत. ते सांभाळले तरी फार झाले, ते फार उथळपणाने बोलतात. त्यांनी इतक्या उथळपणाने बोलू नये,
असा टोला भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जानकर यांना लगावला आहे. जानकर यांच्या आरोपाला आता मोहित कंबोज काय उत्तर देणार?
याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी एका बाजूला ईव्हीएमवर आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. तर त्याच वेळेला जानकर मात्र सातत्याने ईव्हीएमवर आरोप करताना दिसत आहेत.