धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले अजितदादा ?
What did Ajitdada say on Dhananjay Munde's resignation?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यानंतर आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे,
या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत या भेटीत काय निर्णय होणार याबाबत मोठी उत्सुकता होती, त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली आहेत. मी ती घेतली पाहिली. मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. पण त्यांना नागपूरला जायचं असल्यानं मी त्यांना आत्ताच भेटलो.
त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जशा दमानिया भेटल्या तशा त्या मलाही भेटल्या. मलाही त्यांनी काही कागदपत्रं दिले आहेत. या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत.
एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन. ही कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत. कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते,
म्हणून ते सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आले आहेत. जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल, असं मुख्यमंत्री यांनी सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासूनच सांगितलं. जी घटना सरपंचांच्याबाबत बीड जिल्ह्यात घडली. त्याची चौकशी सुरू आहे.
दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा प्रयत्न सुरू आहे. चौकशी चालू आहे. कुणाची आणखी नावे आली तर त्यावरही कारवाई केली जाईल.
पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठी घालणार नाही. ही माझी, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे.
माझ्यावर आरोप झाले, तेव्ही मी राजीनामा दिला होता. माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या वेळी जी घटना घडली होती मला ते असह्य झालं,
म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशी सुरू आहे. दोषींना पाठिशी घालणार नाही, कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आवादा खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडबरोबरच धनंजय मुंडे यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम भाजप आमदार सुरेश धस यांनी केले.
खून प्रकरण समोर आल्यानंतर परळी पॅटर्नचा वारंवार उल्लेख करून धनंजय मुंडे यांना सातत्याने सुरेश धस घेरत आहेत. त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षनेतृत्वाने घ्यावा, मुख्यमंत्र्यांचा यात विषय नाही,
असेही ते सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी धस यांच्याबद्दल बोलताना संताप व्यक्त केला.
अजित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. अंजली दमानिया यांनी घेतलेली भेट, धनंजय मुंडे यांचा राजीनामा, पालकमंत्री म्हणून बीडचा दौरा आदी विषयांवर अजित पवार यांनी उत्तरे दिली.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतलाच पाहिजे, या सुरेश धस यांच्या मागणीवर बोलताना अजित पवार म्हणाले, सुरेश धस यांना काय वाटतंय, याच्याशी मला काही देणंघेणं नाही.
मी भाजपबरोबर सरकारमध्ये आहे. माझे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणेचालणे असते. भाजपकडून मला काही सांगायचे असेल तर अमित शाह, जेपी नड्डा,
देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे सांगतील. वरिष्ठ पातळीवरील सगळ्या नेत्यांसोबत मी संपर्क ठेवून आहे, अशा शब्दात धस यांना सुनावत खालचा कार्यकर्ता म्हणून अजित पवार यांनी त्यांची खिल्लीही उडवली.
मी वरिष्ठ नेत्यांशी बोलतो. तुम्ही कुणाला नेता समजता मला माहिती नाही, असा टोला लगावत खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर काही अंतच राहणार नाही, तुम्ही ज्यांना नेते समजता ते नेते नाहीत, असेही अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीत आतापर्यंत आरोप झाल्यावर राजीनामा द्यायची प्रथा होती. स्वत: अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक अशी उदाहरणे आहेत. मग धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात नेमके काय झाले आहे? असे विचारले असता,
माझी गोष्ट वेगळी होती. उद्विग होऊन मी राजीनामा दिला होता. परंतु बीड प्रकरणातही मी आपल्याला वारंवार सांगतोय, तीन स्तरावर चौकशी सुरू आहे, कुणालाही पाठिशी घेतले जाणार नाही, दोषी आढळल्यास कारवाई करू… असे अजित पवार म्हणाले.