लाडकी बहीण योजना ;बनावट अर्जदारांवर काय कारवाई होणार,मंत्री अदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Ladki Bahin Yojana; Minister Aditi Tatkare clearly stated what action will be taken against fake applicants
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत असून आत्तापर्यंत राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत जुलै ते जानेवारी अशा 7 महिन्यांचे एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिली, एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच राज्यातील,
तसेच काही बांगलादेशी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच आता प्रशासन खडबडून जागं झालं असून
आता यासंदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ चुकीची माहिती देवून लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार’ अशी माहिती अदिती तटकरेंनी ट्विटमधून दिली आहे.
X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरील अधिकृत अकाऊंटवर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. अर्जदारांच्या छाननीबाबत सरकार सजग आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असं अदिती तटकरेंनी नमूद केलं आहे.