मुंबई पोलीस दलामध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता;काय आहे कारण ?
The struggle to retain the 'chair' of the Senior Police Inspector
एप्रिल-मेदरम्यान होणाऱ्या पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या आणि बढत्या जुलै महिना संपत आला तरी केल्या जात नसल्याने मुंबई पोलीस दलामध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे.
शिपायापासून ते सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या (एसीपी) अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या रखडल्या आहेत. विशेष म्हणजे ‘एसीपी’च्या बढतीसाठी ग्राह्य असूनही बढती नाकारत
अनेकांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची ‘खुर्ची’ टिकवण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. गृहमंत्रालय, महासंचालक कार्यालय
आणि आयुक्त कार्यालयातून बदल्या, बढत्यांच्या विलंबाची नेमकी कारणे समजत नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
मुलांच्या शाळा, वास्तव्याचे ठिकाण तसेच इतर बाबींची तजवीज करायला वेळ मिळावा यासाठी पोलिसांच्या बदल्या, बढत्या दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केल्या जातात.
यावर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. जून संपून जुलै महिन्यातील काही दिवस शिल्लक राहिले तरी अद्याप आदेश निघत नसल्याने पोलिस नाराज आहेत.
शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक, उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्तपदापर्यंतच्या बढत्या, बदल्या खोळंबल्या आहेत.
पोलिस दलामध्ये सध्या दररोज बदल्या आणि बढत्यांची चर्चा सुरू असते. नेमके कारण माहीत नसल्याने पोलिस केवळ वेगवेगळ्या
कारणांचा अंदाज व्यक्त करताना दिसत आहेत. ‘पसंतीच्या पोस्टिंग’साठी तर हा विलंब नाही ना, अशीही कुजबुज सुरू आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढत्यांची यादी दररोज बदलत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी १८९ पोलीस निरीक्षक या बढतीसाठी ग्राह्य होते.
मात्र यातील काहींनी शक्कल लढवत आपल्या कार्यकाळातील एखादे प्रकरण विभागीय चौकशीसाठी जाणीवपूर्वक पुढे आणले. कागदोपत्री विभागीय चौकशीचा शेरा दिसत असल्याने त्यांना बढत्या देता येत नाहीत.
बढतीसाठी ग्राह्य असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या ९८ वर आली आहे. काहींनी बढती नाकारली, काही बढतीची वाट पाहत निवृत्त झाले. यापैकी बहुतांश निरीक्षक ‘एसीपी’ प्रमोशनसाठी इच्छुक असूनही बढत्यांचे आदेश जारी होत नाहीत.
बढत्यांचे आदेश काढण्यासाठी चालढकल केली जात असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रांगेत असलेल्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
‘
जुन्या प्रकरणांच्या फाइल चौकशीसाठी पुढे करण्याबरोरच बढती घेण्यास इच्छुक नसलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी इतरही पळवाटा शोधून काढल्या आहेत.
बढती देताना जात प्रमाणपत्र, मराठी, हिंदी भाषेचे तसेच संगणक प्रशिक्षणाचे (एमएससीआयटी) प्रमाणपत्र, तसेच इतर कागदपत्रांची गृहविभाग, महासंचालक कार्यालयाकडून मागणी केली जाते.
मात्र बढती घ्यायची नसल्याने वारंवार मागणी करूनही काही निरीक्षकांनी या कागदपत्रांची अद्याप पूर्तता केली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.